सध्या सर्वत्र लग्नसराईचा माहोल सुरू आहे. मराठीसह हिंदी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणदीप हुड्डा हा देखील लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याने ‘सरबजीत’, ‘लव्ह आज कल’, ‘लाल रंग’, ‘हायवे’ यांसारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांतून अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. दरम्यान अनेक वर्षांच्या रिलेशननंतर तो मैत्रिण लीन लैश्रामबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे.
रणदीप बऱ्याच दिवसांपासून त्याच्या प्रियसीबरोबर रिलेशनमध्ये आहे. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्या लग्नाविषयीच्याअनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. त्यामुळे हे दोघे नक्की कधी लग्न करणार? याविषयी चाहत्यांना प्रश्न पडला होता. मात्र आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेत त्यांच्या चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का दिला आहे. त्याचबरोबर त्यांच्या लग्नाची तारीखही ठरली आहे. या महिन्याच्या अखेरीस हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.
आणखी वाचा – Video : रणबीर कपूरने गोंदवला राहाच्या नावाचा टॅटू, लेकीचं कौतुक करण्यात अभिनेता व्यस्त, व्हिडीओ व्हायरल
या महिन्याच्या शेवटी म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. रणदीप हा हरियाणाच्या रोहतकचा रहिवासी आहे, तर लीन ही माणिपूरची आहे. त्यामुळे माणिपूरच्या पारंपरिक रीतीरिवाजानुसार हे लग्न होणार असल्याचे म्हटले जात आहे. रणदीप हरियाणावरुन त्याच्या लग्नाची वरात माणिपूरमध्ये घेऊन जात लीनबरोबर लग्न करणार आहे. अर्थात याबद्दल रणदीपने अद्याप अधिकृत भाष्य केलेलं नाही.
त्याचबरोबर लग्नानंतर हे दोघे मुंबईत त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टीदेखील देणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, रणदीप लवकरच ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटात दिसणार आहे. ज्यात तो स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा तोच सांभाळताना दिसत आहे.