मनोरंजन विश्वातून नुकतीच एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिथुन चक्रवर्तीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मिथुन चक्रवर्ती यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घरी असताना बराच वेळ त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यामुळे ते सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहेत.
मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांचे अनेक चाहते मंडळी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याआधी २०२२ मध्येदेखील मिथुन चक्रवर्तीचा हॉस्पिटलमधून एक फोटो व्हायरल झाला होता. यावेळी अनेक प्रकारच्या अफवाही पसरवल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने वडिलांच्या तब्येतीची माहिती दिली होती.