‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील ‘व्हायरस’ची भूमिका असो किंवा ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ चित्रपटातील डॉक्टरची भूमिका बोमन इराणी यांचा अभिनय नेहमी डोळ्यासमोर उभा राहतो. त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेलं प्रत्येक पात्रं हे त्यांच्यासाठीच बनवलं असावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यांच्या अभिनयाचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. पण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. याबाबत त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रवासाबद्दल सांगितलं.(Actor Boman Shared Struggle Life Story)
‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत बोमन यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. त्यांचा सुरूवातीचा काळ खूप कठीण होता. त्यांच्या जन्माच्या ६ महिन्याआधीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर आली. सिंगल मदर म्हणून त्यांच्या आईवर बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या. त्यांच्यासह त्यांच्या तीन बहिणींना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या आईवर होती. सुरुवातीला त्यांचं बेकरीचं दुकान होतं. जिथं त्यांची आई व काकी काम करायची. त्याच्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे.
वाचा – कसा होता बोमण इराणी यांचा सुरुवातीचा प्रवास?(Actor Boman Shared Struggle Life Story)
ते जेव्हा माध्यमिक शाळेत होते तेव्हा त्यांचात आत्मविश्वास फार कमी होता. लोकांशी संवाद साधणंही त्यांना अवघड वाटायचं. पण पुढे आईच्या प्रेमामुळे त्यांचा स्वतःवरचा विश्वास वाढू लागला. शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात ते भाग घेऊ लागले. पुढे स्वतःची बेकरी असल्यामुळे बोमन यांनी त्यातच काम करून कौटुंबिक व्यवसाय पुढे चालवण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबाने घेतला. पण त्यांना तो निर्णय अजिबात मान्य नव्हता. त्यांना स्वतःच्या हिंमतीवर काहीतरी मोठं करायचं होतं. याबाबत त्यांनी सांगितलं की, ”सुरुवातीला मी ताज हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं. हे काम करताना मला खूप अनुभव आले आणि त्यातून मी शिकत गेलो. यावेळी मला मिळालेल्या टिप्स मी पिगी बँकमध्ये गोळा करायचो”.
बोमन यांना फोटोग्राफीचीदेखील आवड होती. पण त्यावेळी कॅमेरा विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. वयाच्या ३२व्या वर्षी त्यांनी कॅमेरा विकत घेतला. पुढे त्यांनी स्पोर्ट्स पिक्चर्स क्लिककरुन वर्तमानपत्रातही प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यांचे हे फोटो परदेशी मासिकासाठीदेखील विकले गेले. त्यातून त्यांना बरेच पैसे मिळाले.
त्यांना आयुष्यात स्थिरता हवी होती. त्यामुळे त्यांनी पुढे स्टुडिओ सुरु करण्याचा विचार केला. पण त्यांना या व्यवसायातून बरंच आर्थिक नुकसान झालं. स्टुडिओचं भाडं भरण्यासाठीदेखील त्यांच्याकडे पैसे शिल्लक नव्हते. अशा परिस्थितीतही त्यांनी तो स्टुडिओ २ वर्ष सुरु ठेवला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात बॉलिवूड कोरिओग्राफर श्यामक दावर आले आणि त्यानंतर त्यांच आयुष्य बदललं.