बॉलिवूडचा मिस्टर परफेक्ट अभिनेता आमिर खान त्याच्या हटके चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याचे आजवर बरेच चित्रपट सुपरहिट ठरले आहे. त्यातील एक चित्रपट जो बराच गाजला तो म्हणजे ‘३ इडियट्स’. या चित्रपटातील सहकलाकार म्हणून काम केलेले अभिनेते अखिल मिश्रा यांचं काम चांगलंच गाजलं. अभिनेता अखिल यांचं २ महिन्यांपूर्वीच निधन झालं आहे. त्यांच्या स्वयंपाक घरात काम करत असताना टेबलावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या २ महिन्यांनंतरही त्यांच्या पत्नीला सुझान बर्नेटला त्यांची आठवण येत आहे. त्यांच्या बायकोने आठवणीत भावनिक पोस्ट लिहीली आहे. (akhil Mishra wife Suzanne bernert emotional note)
सुझानने अखिल यांच्या आठवणीत पोस्ट लिहीत त्यांच्याबरोबरचे बरेच फोटो शेअर केले. भावनिक कॅप्शन लिहीत ती म्हणते, “तुला जाऊन २ महिने होऊन गेले. मला अजूनही विश्वास बसत नाही आहे. माझं प्रेम मला सोडून गेलं. ज्या व्यक्तीबरोबर माझा प्रत्येक क्षण मला व्यथित करायचा आहे, सगळ्यात जास्त ज्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे ती व्यक्तीच निघून गेली”.
ती पुढे लिहीते, “मी हैदराबादमध्ये चित्रीकरणासाठी गेले होते आणि आपण दोघांनी एकमेकांना फोटोही पाठवले होते. त्यादिवशी आपण बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींवर चर्चा केली होती. माहित नव्हतं की सगळं शेवटचं आहे. ६वाजून १५ मिनीटांपासून मी तुला फोन करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यावेळी मला माहित नव्हतं की तू रुग्णालयात आहेस आणि त्यानंतर तू कायमचा निघून गेला. तू आता जिथेही आहेस तुला माहित आहे की मी तुझ्यावर खूप प्रेम करते”, असं लिहीत तिने अखिल यांच्या आठवणीत भावनिक होत पोस्ट लिहीली.
अखिल हे छोट्या पडद्यावरील बऱ्याच कार्यक्रमांत दिसले होते. ‘उतरन’, ‘उडान’, ‘सीआईडी’, ‘श्रीमान’, ‘श्रीमती’, ‘हातिम’ सारख्या मालिकाही केल्या. मालिकांसह त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘डॉन’, ‘गांधी’, ‘माय फादर’, ‘शिखर’, ‘कमला की मौत’, ‘वेल डन अब्बा’ सारख्या चित्रपटांमध्येही ते महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. त्यांनी आपल्या अभिनयातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.