या वर्षी ‘बिग बॉस’ मराठीचं पाचवं पर्व चांगलंच चर्चेत राहिले आहे. टिकटॉकस्टार सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता झाला. विजेता झाल्यानंतर त्याचे सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्यावर मी माझं स्वतःचं घर बांधणार असल्याचेही बरेचदा म्हटलं होतं. त्याच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बऱ्याच जणांनी पुढाकारही घेतला. आता अखेर या घराच्या कार्याचा श्रीगणेशा झाला आहे. नुकतेच सूरज चव्हाणच्या नवीन घराचे भूमिपूजन पार पडले. ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीसुद्धा सूरजची भेट घेऊन त्याच्या घराच्या स्वप्नाला हातभार लावण्याचे वचन दिले होते आणि आता हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. (suraj chavhan home)
येत्या सहा महिन्यात त्याचे हे नवीन घर उभे राहणार असल्याचा खुलासा स्वतः सूरजनेच केला आहे. तसंच या नवीन घरासाठी धनंजय पोवार फर्निचर देणार असल्याचेही त्याने आधी सांगितले होते. धनंजय यांनी सूरजच्या नवीन घरात त्यांच्या दुकानातील वस्तू देणार असल्याचे सांगितलं आहे. दरम्यान आता सूरजचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सूरज घराच्या बांधकामामध्ये मदत करत असल्याचे दिसून येत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सूरज घराच्या बांधकामांवर पाणी मारताना दिसत आहे. तसेच घमेल्यामध्ये सीमेंट भरुन देतानाही दिसत आहे. घर बांधताना त्याने केलेली मेहनत दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने “माझं घर, लवकरच ‘बिग बॉस’चा बंगला”, असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
सूरजचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याच्या व्हिडीओला अनेकांची पसंती मिळाली आहे. तसेच नेटकरी यावर प्रतिक्रिया देतानाही दिसत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली की, “स्वतःचं घर स्वतः तयार करत आहे”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “स्वतः केलेली मेहनत कधीही वाया जात नाही, तसेच अजून एकाने लिहिले की, “सूरज तुझ्या जिद्दीला सलाम”. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, सूरज चव्हाण यंदाच्या ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यामुळे त्याला १४ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस तसेच एक स्कुटी मिळाली. तसंच त्याचा ‘झापुक झुपूक’ हा नवीन चित्रपटही येत आहे. याशिवाय त्याला इतरही बऱ्याच जणांनी मदतीचा हात पुढे केला आहे.