टीआरपीच्या स्पर्धेत जिंकण्यासाठी प्रत्येक चॅनल कसून प्रयत्न करत असतं. प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहता यावं, यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट आणले जातात. मात्र अनेकदा काही मालिकांना टीआरपीच्या शर्यतीत आपलं स्थान टिकवून ठेवण्यात यश मिळत नाही. त्यामुळे या मालिका ऑफ एअर जातात. याउलट काही मालिका या चार-पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करुन जातात. या वर्षातही काही मालिकांनी टीआरपीच्या कारणामुळे बंद झाल्या. तर काही मालिकांचे कथानक पूर्ण झाल्यामुळे या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. कोणत्या आहेत या मालिका? चला जाणून घेऊया… (Marathi Serials off aired in the year 2024)
आई कुठे काय करते : ‘आई कुठे काय करते’ मालिकेने तब्बल ५ वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात होता. अरुंधती, यश, आप्पा, अनघा, इतकंच नव्हे तर अनिरुद्ध व रुपाली या कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. पण पाच वर्षांच्या निखळ मनोरंजनानंतर काही दिवसांपूर्वी निरोप घेतला. गेली अनेक वर्षे ही मालिका सुरू असल्याने कलाकारांनासुद्धा शूटिंगच्या शेवटच्या दिवशी अश्रू अनावर झाले होते.
सातव्या मुलीची सातवी मुलगी : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका मागील दोन वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीमध्ये आहेत. झी मराठी वाहिनीवरील टीआरपीमध्ये अव्वल असणाऱ्या मालिकेमध्ये ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले,रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारही होते.
भाग्य दिले तू मला : ‘भाग्य दिले तु मला’ ही मालिका कन्नड मालिका ‘कन्नदती’चा रिमेक होती. अभिनेत्री तन्वी मुंडले, अभिनेता विवेक सांगळे आणि निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेने अल्पवधीतच चाहत्यांच्या मनात घर केलं. साधारणतः २०२२ मध्ये ही मालिका सुरू झाली होती. त्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर यंदाच्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला.
मन धागा धागा जोडते नवा : सार्थक आणि आनंदी यांची लग्नानंतरची प्रेमकहाणी असणारी ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय ठरली. दिव्या पुगावकर आणि अभिषेक रहाळकर ‘मन धागा धागा जोडते नवा’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत होते. काही महिन्यांपूर्वी या मालिकेत ६ वर्षांचा लीप दाखववण्यात आलेला. मात्र काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
सारं काही तिच्यासाठी : झी मराठीवर ‘उदे ग अंबे उदे’ ही मालिका, याशिवाय ‘सावळ्याची जणू सावली’ या नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे सारं काही तिच्यासाठी मालिकेने या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडे व अभिनेते अशोक शिंदे मुख्य भूमिकेत होते.
अबीर गुलाल : २७ मे ला सुरू झालेली मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात भरली. अवघ्या सहा महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. कमी टीआरपीमुळे या मालिकेने अवघ्या सहा महिन्यांत प्रेक्षकांना गुडबाय केलं. या मालिकेत अभिनेता अक्षय केळकर, पायल जाधव, गायत्री दातार प्रमुख भूमिकेत आहेत. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.
दुर्गा : कलर्स मराठी वाहिनीवर ‘दुर्गा’ ही मालिका २६ ऑगस्टला सुरु झाली होती. पण नोव्हेंबर महिन्यातच ही मालिका संपली. अवघ्या तीन महिन्यांमध्ये मालिका संपत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच अवघ्या तीन महिन्यांत मालिका बंद झाल्याने याबद्दल अनेकांनी आश्चर्यदेखील व्यक्त केलं होतं. मालिकेत रुमानी खरे व अंबर गणपुळे यांनी मुख्य भूमिका सकारल्या होत्या.