Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट होते. अरबाज पटेल, आर्या जाधव, निक्की तांबोळी, धनंजय पवार, अभिजीत सावंत, छोटा पुढारी घन:श्याम दरवडे व सूरज चव्हाण या सात जणांना सगळ्यांनी मिळून नॉमिनेट केलं होतं. त्यामुळे यांच्यापैकी घराचा निरोप कोण घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अशातच भाऊच्या धक्क्यावर अचानक नॉमिनेशन प्रक्रिया झाली याने सगळ्यांना धक्का बसला. यंदाच्या या पर्वातून सर्वांच्या लाडक्या छोटा पुढारीला म्हणजेच घनःश्याम दरवडेला निरोप घ्यावा लागला.
‘मूर्ती लहान, कीर्ती महान’ असणारा छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे ‘बिग बॉस मराठी’च्या घरामधून बाहेर पडला असल्याचं समोर आलं. आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या घन:श्यामने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही चांगलाच धमाका केला. संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये राज्य करण्याचा प्रयत्न करत घन:श्यामने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही चांगलीच हवा होती. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.
आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा छोटा पुढारी ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेताना म्हणाला,”टास्क आहे. खेळ हा खेळ असतो. मी टास्कमध्ये, खेळामध्ये हरलो असलो तरी ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये एक माणूस म्हणून चांगलं जगण्याचा मी प्रयत्न केला आहे. चांगला माणूस कसा असावा हे ‘बिग बॉस मराठी’च्या घरामधून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी १००% टक्के ‘बिग बॉस मराठी’चा गेम परिपूर्ण खेळलो आहे”.
आणखी वाचा – ना गळ्यात मंगळसूत्र, ना कपाळाला टिकली; दर्शनासाठी आलेल्या दीपिका पदुकोणचा लूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले…
‘बिग बॉस मराठी’च्या घरात घन:श्यामने एक चमक, धमक घेऊन प्रवेश केला होता. पण मध्ये अचानक तो शांत झाला आणि बाजी पलटली. यासंदर्भात बोलताना छोटा पुढारी म्हणाला,”इथे डोक्याने गेम चालतो आणि मी माझ्या मनाने गेम खेळलो आहे. माणसं जोडली, माणसांना मी माणसांप्रमाणे वागवत होतो पण लोकांनी डोक्यात ठेऊन गेम केला. माझा गेम कुठे चुकला, कुठे पलटला असं मला वाटत नाही. पण बिग बॉसच्या घरात दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं एवढं मात्र मला कळलं”.