Ankita Walavalkar On Pushpa 2 : अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २ द रूल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात जबरदस्त कमाई करत आहे. दुसऱ्या दिवसाचा वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस रिपोर्टही आला आहे.अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २: द रुल’ने रिलीज होताच अनेक सुपरस्टार्सच्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटाने दोन दिवसांत जगभरात ४०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सुकुमार दिग्दर्शित तेलुगू ॲक्शन ड्रामा हा २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा सिक्वेल आहे. पुष्पा राजची जादू केवळ भारतातच नाही तर परदेशातही पाहायला मिळत आहे.
अनेक कलाकार मंडळी व चाहते मंडळी हा चित्रपट पाहत आहेत. अशातच हा चित्रपट सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ फेम अंकिता वालावलकर हिने पाहिला. अंकिता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अंकिताने पुष्पा २ हा चित्रपट पाहिल्यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चित्रपटाबाबत तिला काय वाटतं हे तिने इंस्टाग्रामद्वारे स्पष्टपणे मांडलं आहे. सर्वत्र ‘पुष्पा २’ ची क्रेझ पाहायला मिळत असताना अंकिताने या चित्रपटाबाबत मांडलेलं तिचं मतं विचार करायला भाग पाडतंय.

अंकिताने चित्रपट पाहून आल्यावर स्टोरी पोस्ट करत असं म्हटलं की, “अभिनय १००/१०० . स्टोरी काहीच नाही. पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग यापेक्षा खूप चांगला होता. कृपया तुम्ही तुमचे पैसे वाया घालवू नका. मला वाटतं करमणूक हे एक सशक्त माध्यम आहे आणि जे चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात ते काळजीपूर्वक चालले पाहिजेत”. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाबाबत अंकिताने केलेलं विधान अधिक लक्षवेधी आहे.
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ने बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कामगिरी केली आहे. सर्व भाषांमध्ये १७४.९ कोटींहून अधिक कमाई केल्यानंतर, या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ही पकड तशीच ठेवली. भारतात या चित्रपटाने तब्बल ९०.०१ कोटींची कमाई केली. Sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, दोन दिवसात २६५ कोटींच्या मोठ्या कलेक्शनसह, ‘पुष्पा २’ ने अधिकृतपणे जगभरात ४०० कोटी कलेक्शनचा टप्पा ओलांडला आहे.