विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना मंगळवारी विरारमध्ये तुफान राडा झाला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भाजप नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर विनोद तावडे थांबलेल्या विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतच्या रुम नंबर ४०४ मध्ये नऊ लाख रुपयांची कॅश आढळून आली. विनोद तावडे हे पाच कोटी रुपये वाटणार असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला. त्यानंतर प्रकरण चांगलंच तापलं. विरारच्या एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला. (Aastad Kale on Vinod Tawde Money Distribution)
ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. ब. वि. आ.चे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरु झाली. काही वेळातच आमदार क्षितीज ठाकूरदेखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे यांना दाखवली. यावेळी भाजप आणि ब. वि. आ. कार्यकर्ते आपापसात भिडले. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अशातच या प्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेता व बिग बॉस मराठी फेम आस्ताद काळेने एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही आवाहन केलं अन्…; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
आस्तादने त्याच्या इन्स्टाग्रामवर याबद्दलची पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “ते तसं नव्हतं हो! प्रत्येकी(ला) ३००० द्यायचेत ना?? त्यासाठी गोळा केलेले पैसे होते ते!”. यापुढे आस्तादने “JOKES APART” असं म्हणत “आता या “विनोदाचं” काय होईल? ED लागेल?… बडतर्फी होईल?… पापक्षालन+शुद्धीकरण होईल?… NOTA?…” असे काही प्रश्नही विचारले आहेत. आस्तादनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या या प्रश्नाला काही उत्तरेही दिले आहेत.
आणखी वाचा – “यावेळी मतदान करु शकणार नाही पण…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “दुर्दैवाने…”
दरम्यान, दरम्यान आता या सर्व प्रकरणानंतर भाजप नेते विनोद तावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद तावडे आणि उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्यानं विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरारमधील तुळींज पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.