गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विधानसभा निवडणुकांची मोठी चर्चा होती. महाराष्ट्रात आता सत्ता कोणाच्या हाती जाणार, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. याच निवडणुकांचं आज मतदान पर पडत आहे. प्रत्येक नागरिकाचे मत हे मौल्यवान आहे, त्यामुळे १०० टक्के मतदान व्हावे, प्रत्येक नागरिकाने मतदान करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. आज सामान्य नागरिकांसह मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनीही त्यांचा मतदानाचा अधिकार बजावला. याचे काही खास फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसंच सर्व चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहनही केलं आहे. (Marathi Artist Vote Photos)
रितेश व जिनिलिया देशमुख यांनी लातूर विधानसभेसाठी मतदार केंद्रावर जाऊन मतदान केलं आहे. अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे रांगेत उभं राहून यावेळी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचं आवाहन या जोडीनं केलं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या कुटुंबासह मतदान केलं. याचे फोटो शेअर करत तिने एक चारोळीही केली. “करा आज योग्य selection…Today is the day of election…समाजात हवं असेल जर perfection…तर करु नका या संधीचं rejection”, अशी चारोळी सोनालीने केली.
अभिनेता, दिग्दर्शक व लेखक हेमंत ढोमेनेही मतदान केल्यानंतर खास पोस्ट शेअर केली आहे. फोटो शेअर करत “माझं मत… ऐक्यासाठी… विकासासाठी… भयमुक्त सुरक्षित वातावरासाठी! माझं मत शेतकऱ्यांसाठी… दुर्बल घटकांसाठी! माझं मत जातीय सलोख्यासाठी… महाराष्ट्रधर्मासाठी! शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी!” असं म्हटलं आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही मतदानाचा फोटो शेअर करत तिने असं लिहिलं आहे की, “मी मतदान केलं. लक्षात ठेवा, बोटं उगारायचा अधिकार हा बोटावर शाई लावल्यावरच मिळतो. आज मतदानाचा हक्क प्राधान्याने आणि जबाबदारीने बजावावा”.
आणखी वाचा – “यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्र सोडवा”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला “हा ‘विनोद’…”
अभिनेता सुबोध भावे याने सकाळी लवकर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यानंतर सुबोध भावेने नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनीही पत्नी नेहा देशपांडे यांच्यासोबत मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावला. याचबरोबर रवी जाधव, प्राजक्ता माळी, सायली संजीव, बांदेकर व सराफ कुटुंबियानीही मतदान केले. वैदही परशुरामी, उमेश व प्रिया बापट, जुई गडकरी, सावनी रवींद्र अशा अनेकांनी आज मतदान केले आहे.