यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं आहे. यानिमित्त त्याच्यावर सध्या सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. मोढवे गावात अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’चा विजेता ठरला. एकेकाळी मजुरी करुन जगणारा सूरज आता महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा लाडका ‘बिग बॉस’ स्पर्धक ठरला आहे. त्याची साधी बोली आणि साधं राहणीमान यामुळे त्याने अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि तो यशस्वी झाला. (Ajit Pawar Will Give Home To Suraj Chavan)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात त्याने “मी ‘बिग बॉस’ला कधीच विसरणार नाही. आता हा शो संपल्यावर मी बाहेर जाऊन माझं घर बांधणार आणि त्या घराला ‘बिग बॉस’ असं नाव देणार” असं म्हटलं होतं. सूरजच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची… आणि हीच परिस्थिती ओळखत एका नामांकित कंपनीने सूरजला काही भेटवस्तू दिल्या. एका नामांकित कंपनीकडून सूरजला त्याच्या नवीन घरात लागणाऱ्या घरातल्या ज्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू दिल्या. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला नवीन घर देणार असल्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – कॅन्सरमुळे अशी झाली आहे हिना खानची अवस्था, डोळ्यांचा फोटो शेअर करत म्हणाली, “एक काळ असा होता की…”
‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार, यावेळी अजित पवार असं म्हणाले की, “महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार यांच्या ज्या घरकुल योजना आहेत, त्यात त्याला एक घर मिळालं आहे. त्यात एक खोली असते. पण ते सगळं बघितल्यानंतर आणि याचा विचार करता माझ्या सगळ्या सहकऱ्यांनी निर्णय घेतला त्याला एक चांगल्या पद्धतीने 2BHK चे घर, हॉल, किचन, डायनिंग बांधून द्यायचं. त्याबद्दल सूचनाही मी दिलेल्या आहेत. दोन-तीन जागा बघून त्याला एक चांगल्या प्रकारचे हक्काचे घर मिळाले पाहिजे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की, तसं सूरजला घर देण्याचे काम आम्ही करणार आहोत”.
आणखी वाचा – बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढविली, बिश्नोई गँगची धमकी, प्रकरण वाढलं
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’चे विजेतेपद जिंकताच सुरजला १४ लाख ५० हजारांचे बक्षीस तसेच पु.ना. गाडगीळ यांच्याकडून १० लाख रुपयांचे वाउचर व एक ईलेक्ट्रिक स्कुटीदेखील मिळाली आहे. याशिवाय केदार शिंदे त्याला घेऊन एक चित्रपटही करणार आहेत. या चित्रपटाचा नायक स्वतः सूरज चव्हाणच असेल. त्याचा लोकप्रिय डायलॉग ‘झापुक झुपूक’ हेच या चित्रपटाचे नाव आहे. त्यानंतर त्याला काही भेटवस्तू मिळाल्या. अशातच आता सूरजला नवीन घर मिळणार आहे.