मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही त्यांच्या अभिनयाबरोबरच सामाजिक भानही जपतात आणि त्यांची हीच कृती सर्वांचे लक्ष वेधून घेते. मराठी सिनेसृष्टीतीळ अशा अनेक कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी. जुई अभिनय क्षेत्रात काम करण्याबरोबरच सामाजिक भानही जपते आणि याच सामाजिक भानमुळे जुई इतरांपेक्षा वेगळी ठरते. ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी तिच्या या मालिकेतील सायली या पात्रामुळे नेहमीच चर्चेत आली आहे. सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी असून, या मालिकेविषयीच्या विविध अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करते. अशातच जुईने सोशल मीडियावर नुकताच एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. (Jui Gadkari Leprosy Help)
जुई गेली अनेक वर्षे आश्रमात जाऊन कुष्ठरोगाशी झुंज देणाऱ्या व अनाथ वृद्धांना मदत करते. गेली १९-२० वर्षे ती हा उपक्रम करत आहे. यंदाही जुई येत्या दिवाळीत हा उपक्रम करणार असून याबद्दल माहिती देणारा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. जुईने तिचा व्हिडीओ शेअर करताना असे कॅप्शन दिले आहे की, “नमस्कार, मला बरेच जण मॅसेज करत आहेत की, यंदा दिवाळीला शांतीवन मध्ये जाणार आहेस का? आम्हाला मदत करायची आहे. तर यंदा २७ ऑक्टोबर २०२४ रोजी आम्ही तिथे जाऊ आणि तिथल्या आजी आजोबांबरोबर, लेप्रसी (कुष्ठरोगी) बरोबर दिवाळी साजरी करु. तुम्ही जर देणगी देण्यासाठी इच्छुक असाल, तर या व्हिडीओखाली कमेंट करा. मी QR कोड शेअर करेन. धन्यवाद”.
आणखी वाचा – कॅन्सरमुळे अशी झाली आहे हिना खानची अवस्था, डोळ्यांचा फोटो शेअर करत म्हणाली, “एक काळ असा होता की…”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी परत-परत दरवर्षीप्रमाणे हेच सांगेन की, काळजी करु नका. तुम्ही दान केलेले पैसे सुरक्षित हातामध्ये असणार आहेत, ते योग्य ठिकाणी आम्ही दान करत आहोत. शांतिवन, नेरे याठिकाणचे ते आश्रम आहे. तिथे जाण्याचे माझे हे साधारण १९-२० वे वर्ष आहे. तिथे जाऊन आम्ही कुष्ठरोगी आणि निराधार आजी-आजोबांबरोबर एक दिवस साजरा करतो. यात कुणाला मदत करायची असेल तर मला कळवा”.
तसंच जुईने असे म्हटले की, गेल्यावर्षी ज्यांनी ज्यांनी मदत केली होती त्यांचे नाव तिने ‘शांतिवन’ला मदत करणाऱ्यांच्या यादीत जोडले आणि त्याचा स्क्रिनशॉटही सर्वांना पाठवला. दरम्यान, जुईच्या या सामाजिक भान जपणाऱ्या कृतीचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे. अनेकांनी या व्हिडीओखाली आम्ही उत्सुक आहोत असं म्हणत कमेंट्स केल्या आहेत. तसंच या व्हिडीओखंळे नेटकऱ्यांनी “खूप छान”, “खूप सुंदर”, “तुझं खूप कौतुक” अशाही अनेक कमेंट्स करत तिचे कौतुक केलं आहे.