Hina Khan Cancer : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. अभिनेत्री गेले काही दिवस ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे आणि यासाठी ती अनेक तपासण्या आणि ऑपरेशनला सामोरी जात आहे. हिना खानला या आजाराबद्दल कळताच ती अजिबात थकून गेली नाही आणि तिचा हाच गुण चाहत्यांनादेखील आवडला आहे. आलेल्या संकटासमोर हरुन न जाता त्या संकटाला हिना खान जिद्दीने सामोरी जात आहे. आत्तापर्यंत तिने पाच केमोथेरपी घेतल्या असून आता त्याचा परिणामही दिसून येत आहे. (Hina Khan Cancer)
हिना खान तिच्यावर होणाऱ्या प्रत्येक तपासणीची माहिती आपल्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. अशातच तिने नुकताच तिच्या डोळ्यांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. केमोथेरपीमुळे तिने तिच्या सुंदर, लांब पापण्या गमावल्या आहेत. आता एक शेवटची पापणी बाकी असल्याचे यात दिसत आहे. तसंच तिच्या भुवयांचे केसही गळून पडले आहेत. हिना खानने हा फोटो शेअर करत स्वतःला व इतरांना उभारी देणारे एक कॅप्शनदेखील लिहिलं आहे.
हिना खानने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “माझ्या प्रेरणेचा स्रोत काय आहे हे जाणून घ्यायचे आहे? एक काळ असा होता की, माझ्या सुंदर पापण्यांनी माझ्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवले होते. हे अनुवांशिकदृष्ट्या खूप लांब आणि सुंदर होते. केमोथेरपीच्या माझ्या शेवटच्या सत्रातील ही एकच पापणी आता माझी प्रेरणा आहे. या कठीण काळातही आपण मात करु”. यापुढे ती एक स्पेशल नोट लिहत असं म्हणाली आहे की, “मी एका दशकापासून बनावट पापण्या घातल्या नाहीत. पण आता मी शूटसाठी खोट्या पापण्या लावते. काही नाही… सर्व काही ठीक होईल…”
आणखी वाचा – बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढविली, बिश्नोई गँगची धमकी, प्रकरण वाढलं
दरम्यान, हिना खान गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला अगदी धीराने सामोरी जात आहे आणि तिच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टखाली जुही परमार, राखी सावंत, स्मृती खन्ना, एकता कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी हिनाच्या या पोस्टवर कमेंट करून तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.