Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस मराठी ५’मधील निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, अंकिता प्रभू वालावलकर, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत या स्पर्धकांची सर्वाधिक चर्चा होते आहे. या स्पर्धकांचा खेळ पाहून सामान्य प्रेक्षकांसह कलाकार मंडळीदेखील आपले मत व्यक्त करत आहेत. काहींबद्दल सकारात्मक बोलले जात आहे, तर काही स्पर्धकांवर टीका केली जात आहे. या स्पर्धकांविषयी या शोचे माजी स्पर्धकही भाष्य करत आहेत. उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, किरण माने, अभिजीत केळकर, मेघा धाडे रुचिरा जाधव यांसह अनेक स्पर्धक आपली मतं सोशल मीडियाद्वारे व्यक्त करत आहेत. (Bigg Boss Marathi Apurva Namelekar)
आधीच्या पर्वातील स्पर्धकांनी नव्या पर्वातील स्पर्धकांवर टीका करणारे व्हिडीओ, सोशल मीडिया पोस्ट, इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्या आहेत. अशातच अपूर्वा नेमळेकरनेदेखील एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या सौंदर्याने आणि अदांनी छोटा पडद्यावरील मालिका गाजवणाऱ्या अपूर्वाने ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमध्ये डावपेच, परफॉर्मेन्सने ‘बिग बॉस’च्या घरात आपली छापली सोडली होती. या चौथ्या सीझनमध्ये अपूर्वा नेमळेकरने टॉप २ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले होते. अपूर्वाबरोबर इतर स्पर्धकांचे झालेले वादही गाजले. अशातच तिने बिग बॉस मराठी ५ बद्दल केलेली एक पोस्ट चर्चेत आहे.

(Apurva Namlekar Instagram Story)
अपूर्वाने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “स्वत:च्या सीझनमध्ये ‘बघे’ असलेले काही स्पर्धक आता सोशल मीडियावर खेळायला उतरले आहेत. तिकडे चावडीच्या भीतीने बोबडी वळलेली असायची आणि आता स्टोरीवर स्टोरी टाकत आहेत. ‘बिग बॉस’मध्ये असताना जे फेम मिळवता आले नाही, ते आता मिळवण्याचा फालतू प्रयत्न सुरु आहे. नापास झालेल्या लोकांनी यूपीएससीवाल्यांना टिप्स देण्यासारखं आहे. परंतू तो ‘बिग बॉस’ आहे. त्याला कितीही नावे ठेवा, तरी तो तुम्हाला नुसतं फेमसच नव्हे तर मोठंही करतो”.
दरम्यान, अपूर्वा सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेद्वारे सावनी या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी तिची ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील शेवंता ही भूमिका खूपच गाजली होती आणि त्यानंतर तिने ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्वही गाजवले. अभिनेत्री या पर्वात विजेती ठरली नसली तरीही तिचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते. दरम्यान अपूर्वा आता पुन्हा ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत आली आहे.