Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा अगदी उद्यावर येऊन ठेपला आहे. ६ ऑक्टोबरला महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. यंदाचं पर्व तुफान गाजलं. सीझनमधले सगळे टास्क, भांडणं, अपमान, स्पर्धकांची मैत्री, निक्की-अरबाज कनेक्शन या सगळ्या गोष्टींची चांगलीच चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांपासून ‘बिग बॉस मराठी’ टीआरपीच्या शर्यतीतसुद्धा आघाडीवर आहे. मात्र, प्रेक्षकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळूनही अवघ्या ७० दिवसांमध्ये हे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेच्या शूटिंगला आता सुरुवात झाली असून, ‘कलर्स मराठी’ने नुकतीच याची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात ब्लॉकबस्टर ठरलेल्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. अखेर या ग्रँड सोहळ्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे या सोहळ्याची खास झलक शेअर करण्यात आली आहे. सूरज व अभिजीत यांच्या महाअंतिम सोहळ्यातील खास झलक शेअर करण्यात आली असून या सोहळ्यात दोघांचा खास लूक आणि खास परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये दोघे ‘तौबा तौबा’ गाण्यावर डान्स करत आहे.
ग्रँड फिनालेमध्ये सूरज व अभिजीत या दोन स्पर्धकांचा जबरदस्त परफॉर्मन्स दिसत असून दोघे सूरजची ‘झापुक झुपूक’ ही डान्स स्टेप करतानाचेही पाहायला मिळत आहे. तसंच सूरज स्कुटीवरून एन्ट्री घेत डान्स करणार असल्याचंही यातून पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या दोघांच्या डान्सवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेषत: प्रेक्षकांना सूरज चव्हाणला पहिल्यांदाच वेस्टर्न लूकमध्ये एकदम स्टायलिश अंदाजात पाहता येणार आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi चे टॉप ६ स्पर्धक, पण सूरजलाच सर्वाधिक सपोर्ट, तुमचं मत कोणाला?
२८ जुलैला एकूण १६ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली होती. यापैकी आता घरात केवळ ६ सदस्य बाकी राहिले आहेत. धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण या सहा स्पर्धकांमध्ये ग्रँड फिनालेला चुरशीची लढत होणार आहे. आता यांच्यामध्ये कोण बाजी मारणार हे ६ ऑक्टोबरला म्हणजेच उद्या स्पष्ट होईल.