Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. येत्या ६ ऑक्टोबरला या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. यंदा ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्यांदाच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी एन्ट्री घेतली होती. यापैकी अल्पावधीतच सूरजला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. कोणाच्याही पाठिंब्याशिवाय आजच्या घडीला त्याने एवढं मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे सोशल मीडियासह सर्वच माध्यमांवर सूरजला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. सोशल मीडियावर तर त्याच्या विजेता होण्याच्या अनेक चर्चा होत आहेत. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)
अशातच कलर्स मराठीने सूरजच्या ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवसाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहेत, ज्यात त्याच्या घरातील एन्ट्रीपासून ते आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीला गेम न समजणारा सूरज हळूहळू खेळात पारंगत होत गेला आणि तो आता अंतिम सोहळ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये सूरजचे काही गाजलेले डायलॉगही दाखवण्यात आले आहेत. गेल्या ७० दिवसांत सूरज व घरातील इतर स्पर्धकांनी त्याच्याबरोबर केलेली मजामस्तीही यातून पाहायला मिळत आहे.
या प्रोमोखाली सूरजच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा आहे सूरज भावाला”, “मराठी मातीतला आमचा सूरज ”, “बिग बॉसचा विजेता तूच आहेस”, “आमचा सूरज भाऊ मंदिराचा प्रसाद खाऊन जगलेला माणूस आहे”, “बिग बॉस मराठीतून तो काहीतरी नवीन शिकला आहे”, “महाराष्ट्रात ५०% मतदान सुरज चव्हाणला आहे”, “विजेता फक्त सुरज भाऊ चव्हाण”, “ट्रॉफीच माहीत नाही पण तु महाराष्ट्राच्या जनतेची मनं जिंकलीस भावा” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासूनच सूरजची चर्चा रंगली होती. त्याच्या या घरातील एन्ट्रीवर नाक मुरडणाऱ्यांची सूरजने आपल्या वागणुकीतून मनं जिंकली आहेत. त्याला गेम कळला नसला तरी त्याला माणसं कळली अशा शब्दांत अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. त्यामुळे आता या शोचा विजेताही तोच व्हावा अशा इच्छा अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.