‘बिग बॉस’चे सध्या १८ वं पर्व खूप चर्चेत आहे. ६ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर पार पडला होता. या शोचे होस्ट सलमान खानने सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांची ओळख करुन दिली. यावेळी स्पर्धकांसह एका व्यक्तीने सगळ्या जनतेचे लक्ष वेधून घेतले. ही व्यक्ती म्हणजे सोशल मीडियावर अधिक सक्रिय असलेले अनिरुद्धाचार्य महाराज. त्यांच्या ‘बिग बॉस’मध्ये येण्याने त्यांचे चाहते अधिक नाराज झालेलेदेखील दिसून आले. या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर त्यांना टीकेचा सामनादेखील करावा लागला होता. सोशल मीडियावर अनिरुद्धाचार्य यांचा मोठा चाहतावर्ग आहे. पण त्यांनी या कार्यक्रमामध्ये येणं अनेकांना रुचलं नाही. नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या होत्या. अशातच आता त्यांनी स्वतः चाहत्यांची माफी मागितली आहे. (bigg boss aniruddhacharya maharaj)
अशातच आता त्यांच्याबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. अनिरुद्धाचार्य यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये अनिरुद्धाचार्य सलमान खानच्या पाया पडताना दिसत आहे. याचा खुलासा स्वतः अनिरुद्धाचार्य यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, “ज्या कोणी हा चुकीचा फोटो अपलोड केला आहे त्या व्यक्तीला अटक करण्यात आले आहे”.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव मोहम्मद आसिफ अली आहे. याने अनिरुद्धाचार्य यांच्या यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असून समाजामध्ये राग निर्माण केल्याचे आरोप केले आहेत. आरोपीचा फोटो शेअर करत अनिरुद्धाचार्य यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, “महाराजांना अपमानित करण्यासाठी या फोटोबरोबर छेडछाड करण्यात आली आहे. तसेच हा फोटो सोशल मीडियावर टाकून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. पण आता पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आले आहे”.
दरम्यान याआधी अनिरुद्धाचार्य यांनी ‘बिग बॉस’ येण्यामुळे चाहत्यांची माफी देखील मागितली होती. पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “जर माझ्या ‘बिग बॉस’मध्ये जाण्याने कोणाही सनातनी व्यक्तीचे मन दुखावलं असेल तर हा मुलगा, हा भाऊ, तुमचा दास सर्व सनातनी लोकांची माफी मागत आहे. पण मला कृपया क्षमा करा. कारण माझा उद्देश फक्त सनातन धर्माचा प्रचार करणं हा आहे”. दरम्यान आता खोट्या फोटोमुळे खूप चर्चेत आले आहेत.