मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्हीवरील मालिका गाजवणारे दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. ऑक्टोबर २०२२ मध्ये कॅन्सरचे निदान झाल्यानंतर, काही काळ ते मनोरंजन विश्वापासून दुरावले होते. मात्र त्यानंतर अतुल यांनी जोरदार पुनरागमन केले. त्या कठीण काळादरम्यान सिनेविश्वातील आणि राजकीय वर्तुळातील अनेकांनी वेळोवेळी साथ दिल्याचे अतुल यांनी विविध मुलाखतींमधून सांगितले होते. या काळात अतुल यांना त्यांच्या पत्नीचीही खंबीर साथ मिळाली. याबद्दलदेखील अतुल यांनी आपल्या भावना वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत. (Atul Parchure Death)
कॅन्सरसारख्या आजारपणातू बाहेर येत अतुल यांनी सौमित्र पोटे यांच्या मित्रम्हणे या यट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. यावेळी अतुल यांनी आपल्या आजारपणात पत्नी, आई व मुलगी यांची खंबीर साथ लाभले असल्याचे सांगितले होते. याबद्दल अतुल यांनी असं म्हटलं होतं की, “सोनिया माझ्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभी होती हे मला माहीत नव्हतं. कारण तिला चारही बाजूंनी लढा द्यायचा होता. मला, माझ्या आईला आणि माझ्या तब्येतीबाबतचं विचारण्यासाठी डॉक्टरांना तिला सामोरे जावे लागत होते. माझ्या तब्येतीबद्दलच्या सगळ्या वाईट बातम्या पहिल्या तिलाच समजत होत्या. त्या पवचवून तिला स्वत:चं कामही करायचं होतं. तिने माझ्या आजारपणात काम नव्हतं केलं. तेव्हा मीच तिला सांगितलं की तू तुझं काम कर नाहीतर तुला वेड लागेल. यावर ती मला म्हणाली होती की, तू बोलत आहेस काम कर, पण माझं मन तरी लगायला हवं ना…”
यापुढे अतुल यांनी असं म्हटलं होतं की, “ती माझ्या पाठीमागे ज्यापद्धतीने उभी होती, त्याला तोड नाही. माझ्या आजारपणात घरी कधीच निराशेचे वातावरण नव्हतं. माझी आई सुरुवातीपासूनच अगदी सकारात्मक आहे. माझी आई, मुलगी आणि माझी बायको या माझ्या आयुषयातील ताकद आहेत. या सासू-सूनांचे इतकं पटतं की विचारायला नको. मी कधीच सासू-सूनांना भांडताना पाहिलं नाही. आम्ही कधी बाहेरून आलो तर सोनियाला आईबरोबर जेवण एकत्र करायचं असतं, ती मला म्हणते तू जा मी आणि आई गप्पा मारत जेवू. आम्हाला बघतच आमची मुलगीही मोठी झाली आहे, त्यामुळे त्या तिघींचे एक वेगळंच आयुष्य आहे. माझी बायको सोनिया आणि माझी आई या दोघी प्रचंड सकारात्मक आहेत”.
दरम्यान, अतुल परचुरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज १५ ऑक्टोबरला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार अगोदर त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अतुल परचुरे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. अतुल यांच्या अंतिम दर्शनावेळी निवेदिता सराफ, सुनील बर्वे, आदेश बांदेकर, संजय मोने, सविता मालपेकर, वंदना गुप्ते, दिशा दांडे, सुप्रिया पाठारे, रोहिणी हट्टंगडी या कलाकारांना अश्रू अनावर झाले.