मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. वयाच्या ५७ व्या वर्षी अतुल परचुरे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वार शोककळा पसरली आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती. मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. यावर त्यांनी यशस्वी मात करत रंगभूमीवर पुनरागमनदेखील केले होते. मात्र पुन्हा बळावलेल्या आजारामुळे या हरहुन्नरी कलाकाराची प्राणज्योत मालवली. (Atul Parchure Death)
अतुल यांच्या निधनानंतर अनेक मराठी कलाकार भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संजय मोने, निर्मिती सावंत, सुनील बर्वे यांसह अनेक कलाकार मंडळी त्यांच्या निधनावर रडताना पाहायला मिळत आहे. अशातच सुप्रिया पाठारेदेखील अतुल यांच्या निधनावर दु:खी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अतुल व सुप्रिया यांनी ‘जागो मोहन प्यारे’मध्ये एकत्र काम केले होते. तसंच अतुल यांनी सुप्रिया यांचं ‘तू तू मी मी’ हे नाटक बघितलं होतं.
त्यानंतर काही कार्यक्रम व पुरस्कार सोहळ्यांना त्यांची भेट व्हायची. त्यामुळे आता अतुल यांच्या जाण्याने सुप्रिया यांना अश्रु अनावर झाले आहेत. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. अतुल परचुरे यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी दुःख व्यक्त केले.
आज (मंगळवार १५ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता अतुल यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यामुळे दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांना अखेरचं पाहण्यासाठी कलाकारांनी गर्दी केली आहे. यावेळी सचिन खेडेकर, चंद्रकांत कुलकर्णी, सुबोध भावे, मंदार देवस्थळी, भारत गणेशपुरे, प्रदीप वेलणकर, अरुण कदम, विद्याधर जोशी, सविता मालपेकर, नेहा पेंडसे, सुप्रिया पाठारे यांसह अनेक कलाकार मंडळी उपस्थित आहेत.