Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ हा रिऍलिटी शो अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. याशोमध्ये स्पर्धकांची आलेली जवळची मंडळी व त्यादरम्यान झालेला संवाद अधिक चर्चेत राहिला. यांत अंकिता लोखंडेची सासू व विकी जैनची आई म्हणजेच रंजना जैन यांनी हजेरी लावली होती. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर विकीच्या आईने अंकितावर अनेक आरोप, प्रत्यारोप केलेले पाहायला मिळाले. यामुळे त्या विशेष चर्चेत आलेल्या पाहायला मिळाल्या. शिवाय ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतरही त्या सूनेबद्दल बरंच वाईट बोलताना दिसल्या.
अशातच आता विकी जैन पहिल्यांदाच त्याची आई रंजनाबद्दल बोलला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान विकीने त्याची आई रंजना जैन व सासू वंदना लोखंडे यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं. इतकंच नाही तर विकीने त्याच्या व अंकिता लोखंडेच्या नात्याबद्दलही सांगितलं. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत विकीने पहिल्यांदाच त्याच्या आई व सासूबाबत भाष्य केलं. तो म्हणाला, “घराबाहेर आल्यानंतर मी सासू व आई दोघींशीही बोललो. दोघीही अगदी मजेत आहेत. दोघींच्याही नात्यामध्ये कोणतीच दरी नाही”. त्यानंतर विकीला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. “तुझ्या वडिलांनी अंकिताच्या आईला फोन करणं चुकीचं होतं का?” असंही त्याला थेट विचारण्यात आलं. यावरही त्याने स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं. कुटुंबामध्ये सगळं काही ठिक असल्याचं त्याने पुन्हा एकदा सांगितलं.
विकी म्हणाला, “वडिलांनी अंकिताच्या आईला फोन करणं चुकीचं होतं. अगदीच त्यांनी लगेचच तो फोन केला. याआधी दोन्ही कुटुंबामध्ये गैरसमजुती तयार झाल्या होत्या तर आम्ही दोघं सावरायला होतो. पण घरामध्ये असताना आमचं त्यांच्याबरोबर बोलणं होत नव्हतं. भावनिक होत दोघांमध्ये फोनवर बोलणं झालं. पण आता सगळं काही सुरळीत आहे”. दोन्ही कुटुंबामध्ये पहिल्यासारख नातं असल्याचं विकीने यावेळी स्पष्ट केलं. शिवाय विकीने त्याच्या व अंकितामधील भांडणावरही भाष्य केलं.
विकी म्हणाला, “आम्ही कधीच अधिक काळ एकत्र राहिलो नाही. मी माझ्या कामासाठी १५ दिवस मुंबईमध्ये आणि १५ दिवस बिलासपुरमध्ये राहतो. पहिल्यांदाच या शोच्यानिमित्ताने आम्ही इतके दिवस एकत्र राहिलो आहे. जेव्हा तुम्ही बाहेर राहता आणि एखाद्या गोष्टीचा राग येतो तेव्हा तुम्ही दुसरीकडे तुमचं मन गुंतवता. पण घरामध्ये दुसरं काही करण्यासाठी नव्हतं. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमजुती वाढत गेल्या. त्यात अधिक बोलणं झालं नाही. काही गोष्टी मला व तिलाही समजल्या नाहीत”. अंकिता घराबाहेर आल्यानंतर नेमकं काय बोलणार? हे पाहणं आता रंजक ठरणार आहे.