Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांचा शेवटचा दिवस आहे. अंतिम फेरीची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘बिग बॉस’चा हा सीझन खूप चर्चेत आहे. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनबरोबर शोमध्ये आली होती. अंकिता ‘बिग बॉस’च्या अंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचली आहे. दरम्यान विकी फिनाले पर्यंत न पोहोचता शोमधून बाहेर पडला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर विकी मजा करताना दिसत आहे, शिवाय त्याला अंकिताची आठवण येत आहे.
विकीने अलीकडेच पापाराझींशी त्याच्या ‘बिग बॉस’च्या प्रवासाबद्दल भाष्य केलं तेव्हा त्याने त्याची पत्नी अंकिताला मिस करत असल्याचं सांगितलं. तिच्या प्रवासाविषयी बोलताना विकी म्हणाला, “शोमधील माझा प्रवास अप्रतिम होता आणि लोकांना तो आवडला याचा मला आनंद आहे. मी खूप आभारी आहे. प्रेम व समर्थनासाठी मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. मी शोचा खूप आनंद घेतला आणि मी ठीक आहे. मी ‘बिग बॉस’ ट्रॉफी जिंकल्यानंतर अंकू घरी येण्याची वाट पाहत आहे”.
विकी पुढे म्हणाला, “मी अंकिताला खूप मिस करत आहे. मला तिच्याबरोबर राहण्याची सवय झाली आहे. आम्ही कधीच वेगळे राहिलो नाही, लग्नाआधीही नाही. त्यामुळे मी फक्त तिची वाट पाहत आहे”. जेव्हा विकीला इतर फायनलिस्टच्या चाहत्यांनी अंकिताला सोशल मीडियावर ट्रोल केल्याबद्दल विचारलं यावरही विकी जैन स्पष्ट बोलला.
विकी म्हणाला, “‘बिग बॉस’ हा एक शो आहे जिथे तुम्ही कोणाचीही इमेज ठरवून चांगली दाखवू शकत नाही. शोमध्ये जसे आहे तसे दिसते. खेळाच्या दबावाखाली लोक चुका करतात आणि काहीतरी करतात. इतका वेळ एकत्र घालवल्यानंतर नाती अधिक घट्ट होतात. आणि तिथून बाहेर पडल्यावरही नाती घट्ट राहतील. अंकिताने ट्रॉफी घरी आणावी अशी माझी इच्छा आहे”.