‘बिग बॉस १७’हा शो आता संपला असला तरीदेखील या शोविषयी व शोमधील कलाकारांविषयी अजूनही चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. या शोमधून बाहेर आलेले सगळेच स्पर्धक आता सर्वत्र मुलाखती देत आहेत आणि या मुलाखतींमधून अनेक मोठे खुलासे केले आहेत. अशातच या शोमधील लोकप्रिय जोडी अंकिता लोखंडे व विकी जैन यांनी त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांवर वक्तव्य केलं आहे. या घरात अंकिता लोखंडे व विकी जैन ही पती-पत्नीची जोडी विशेष चर्चेत आली होती.
‘बिग बॉस १७’मध्ये या दोघांमध्ये अनेकदा वाद, भांडणे झाली. कधीकधी त्यांच्यातील वाद इतके विकोपाला गेले की त्यांच्यात मारामारीदेखील झाली होती. त्यात अनेकदा दोघांच्या वैवाहिक आयुष्यावरही प्रश्नचिन्हे उपस्थित केले गेले. अशातच विकी जैनने त्यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केलं आहे. ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत विकीने असे म्हटले की, “त्याचे आणि अंकिताचे नाते खूप सुंदर आहे. आमच्या नात्यात आमचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही मित्रांसारखी मजा करतो.”
यापुढे त्याने असं म्हटलं की, “‘बिग बॉस १७’च्या घरात आम्ही काही अनोळखी लोकांबरोबर राहत होतो आणि आमच्यात झालेले काही प्रकार हे त्या परिस्थितीमुळेच झाले. पण यापुढे तसे होणार नाही असं मला वाटतं. आम्हा दोघांनाही एकमेकांपासून वेगळे व्हायचे नाही. आमच्यामध्ये सर्व काही ठीक चाललं आहे. अंकिता आणि माझा एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे.”
दरम्यान, अंकिता-विकी यांना ‘बिग बॉस’ शोमुळे चांगलीच लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली आहे. या शोमुळे त्यांना आता आणखी नवीन शोदेखील मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी त्यांचे अनेक चाहतेमंडळी उत्सुक आहेत.