कलर्स वाहिनीवरील चर्चेत राहणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. यंदाचे ‘बिग बॉस’ १७ वे पर्व हे चांगलेच गाजलेले पाहायला मिळाले. हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून घरात फक्त ९ स्पर्धक राहीले आहेत. अशातच ‘बिग बॉस’ने सर्व स्पर्धकांना एक खास भेट दिली आहे. हा शोच्या अंतिम भाग होण्यापूर्वी, ‘बिग बॉस’ सर्व स्पर्धकांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट करुन देणार आहे. त्यामुळे येत्या ‘फॅमिली स्पेशल’ वीकमध्ये अंकिता व विकीची आई ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत.
नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अंकिता व विकी हे दोघे त्यांच्या आईंना पाहून आनंदी व भावुकही झाले असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अंकिताच्या सासूने तिच्या काही जुन्या गोष्टींची आठवण करुन दिली. अशातच दैनिक भास्करशी संवाद साधताना विकीच्या आईने अंकिताच्या वृत्तीवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी विकीची आई (रंजना जैन) असं म्हणाल्या की, “अंकिताचे विक्कीबरोबरचे वागणे योग्य नाही. अंकिताच्या विकीबरोबरच्या वागण्यामुळे तिच्या आईला याबद्दल सांगितले पाहिजे म्हणून मी अंकिताच्या आईला असे म्हटले की, ‘अंकिताने ज्याप्रकारे विकीला लाथ मारली, तशी तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला लाथ मारली होतीत का? तुम्ही तुमच्या मुलीला हेच शिकवलं आहे का?”
यापुढे विकीची आई असं म्हणाली की, “अंकिता चुकीची वागत आहे हे आता आम्ही त्यांना सांगितले नाही तर त्यांना तरी कसे कळणार? त्यामुळे मला वाटत नाही की, मी त्यांना हे विचारुन त्यांचा कोणत्याही प्रकारे अपमान केला आहे. मी फक्त त्यांना वस्तूस्थिती सांगितली. यापुढे विकीच्या आईने असं म्हटलं की, “खेळापेक्षा नाती महत्त्वाची असतात हे मी दोघांनाही पटवून दिले आहे. आधी तुमचे वैवाहिक आयुष्य बघा, मग खेळ खेळा. खेळ जिंकला पण नातं हरलं तर त्याला काय अर्थ नाही ना?”
त्याचबरोबर विकीच्या आईने सलमान खानमुळे विकीचा खेळ बिघडल्याचे मत व्यक्त केले आहे. यावर ती असं म्हणाली की, “विकी खऱ्या आयुष्यात खूप चांगला माणूस आहे. गेल्या काही आठवड्यांत त्याचा खेळ खराब झाला यावरून सलमानने त्याला अनेक बाबतीत सुनावले आणि हे मला आजिबात आवडले नाही. आजपर्यंत विक्कीबद्दल कोणीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे सलमानचे बोलणे ऐकून त्याला वाटते की तो इतका चांगला खेळत असूनदेखील त्याचे काही ऐकले जात नाही आहे. त्यामुळे विकी खूप दुःखी आहे.”
यापुढे विकीच्या आईने मन्नारा व विकी यांच्या मैत्रीत शंका घेण्यासारखे काहीही नाही असंही म्हटलं आहे. सर्वांना मदत करणे हा विकीचा स्वभाव आहे आणि या घरात तो तेच करत आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, या शोचा विजेता हा विकी जैनचं व्हावा अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.