Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’चे यंदाचे १७ वे पर्व हे घरातील स्पर्धकांच्या खेळांपेक्षा भांडणामुळेच अधिक चर्चेत राहिलं आहे. घरातील स्पर्धक हे नेहमीच एकमेकांशी वाद घालताना दिसतात. आतापर्यंत या शो मध्ये अनेक वादविवाद व भांडण प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. अशातच शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये ‘बिग बॉस’ स्पर्धकांना खुलेआम धमकावताना दिसत आहे. घरातील स्पर्धकांचा भयंकर गोंधळ पाहिल्यानंतर ‘बिग बॉस’चा पारा चढला आणि त्यांनी सर्वांना अल्टिमेटम दिला असल्याचे यात दिसत आहे. (Bigg Boss 17 New Pomo Viral)
या प्रोमोमध्ये असे दिसते की, ‘बिग बॉस’ सर्व सदस्यांना एका ठिकाणी बोलवून ‘बिग बॉस’च्या घरातील आधीची दृश्ये दाखवतात. तेव्हा घरातील सर्व वस्तु व्यवस्थित व नीटनेटक्या दिसतात. हे पाहून काही स्पर्धक खूप उत्साहित व आनंदी होतात. यावर ‘बिग बॉस’ सर्वांना “हे कसे वाटले?” असे विचारतात. मग ते घरातील सद्यस्थिती दाखवतात. तेव्हा या दृश्यात घरात पसारा, स्वयंपाकघरातील अस्वच्छता दिसत आहे. कपडे, चप्पल, शूज व सगळे सामान इकडे-तिकडे पसरलेले दिसत आहे.
घराची सद्यस्थिती दाखवल्यानंतर, ‘बिग बॉस’ असे म्हणतात की, “बिग बॉस’चं हे घर सुरुवातीला सौंदर्यासाठी चर्चेचा विषय होता. पण आता तो घरातील अस्वच्छतेसाठी चर्चेचा विषय बनला आहे. हे पाहून मला तुमच्या आरोग्याची काळजी वाटत आहे.” यापुढे ते असे म्हणतात की, “मी तुम्हाला एक तासाचा वेळ देत आहे. या एक तासात घर स्वच्छ करा नाहीतर मला साफसफाई करावी लागेल आणि मी साफसफाई करायला लागलो तर घरातील स्पर्धकांची गर्दी कमी होईल.”
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या या अल्टिमेटमनंतर घरातील सर्व स्पर्धक साफसफाई करायला लागतात. तसेच ‘बिग बॉस’ने घरातील स्पर्धकांच्या साफसफाईबद्दल नकळत दिलेल्या अल्टिमेटममुळे येत्या भागात नक्की कुणाची व कशाची साफसफाई होणार? याविषयी स्पर्धकांमध्ये तसेच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.