आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारे मराठी रंगभूमीतील प्रसिद्ध अभिनेते म्हणजे भरत जाधव. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमातून रंगभूमीवर पदार्पण करणारे अभिनेते भरत जाधव यांनी आजवर विविध नाटकांमधून प्रेक्षकांना हसवले. ‘श्रीमंत दामोदरपंत’ या त्यांच्या नाटकातील ‘गोड गोजिरी’ गाणे अनेकांच्या आवडीचे असून त्यांच्या या गाण्यातील नृत्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सही रे सही, ऑल द बेस्ट, आमच्यासारखे आम्हीच या नाटकांमधून भरत जाधव यांना मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. (Bharat Jadhav new Drama)
गेली अनेक वर्ष रंगभूमीची सेवा करणारे अभिनेते भरत जाधव यांचं ‘सही रे सही’ हे नाटक रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांपैकी एक आहे. ज्याला आज २१ पूर्ण झाली आहे. ‘सही रे सही’ नाटकामध्ये भरत जाधव यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहेत. त्यामुळेच हे नाटक गेली अनेक वर्ष रंगभूमीवर मोठ्या दिमाखात सुरु आहे. नाटकाच्या अनेक प्रयोगांना हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले असून देश-विदेशातही अनेक प्रयोग यशस्वीरीत्या पार पडले आहे.
एकीकडे ‘सही रे सही’ नाटकाला आज २१ वर्ष पूर्ण झालेले असताना अभिनेते भरत जाधव लवकरच एका नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तशी घोषणा खुद्द भरत जाधव यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे. भरत जाधव यांच्या नव्या नाटकाचे नाव ‘अस्तित्व’ असे असणार आहे. ज्यात ते एका वेगळ्या व कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार आहेत. भरत जाधव यांच्या ‘भरत जाधव एंटरटेनमेंट’ बॅनरअंतर्गत या नाटकाची निर्मिती होत असून लेखन व दिग्दर्शन स्वप्नील जाधव करणार आहेत.
हे देखील वाचा – श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी अशोक सराफ का गाठायचे पिळगांवकरांचं घर, म्हणाले, “त्याचे वडील…”
अभिनेते भरत जाधव यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करताना आपल्या नव्या नाटकाची घोषणा केली आहे. भरत जाधव म्हणतात, “रसिक प्रेक्षकहो, आपणा सर्वांच्या आशीर्वादाने ‘सही रे सही’ ला आज २१ वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या लाडक्या ‘भरत’ने मागील ३० वर्ष आपणा सर्वांना खळखळून हसवल्यानंतर तो आपल्यासमोर पुन्हा येत आहे….. पण यंदा हसवायला नाही तर आपल्याला हळवं करायला… नवं नाटक घेऊन…. कधीही न पाहिलेल्या नव्या भूमिकेत…”. त्यांच्या या पोस्टवर कलाकार व चाहत्यांनी नव्या नाटकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा – ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेतून अभिनेते गिरीश ओक करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन, साकारणार ‘ही’ भूमिका, प्रोमो समोर
अभिनेते भरत जाधव यांनी केवळ नाटकच नव्हे तर, चित्रपट, मालिका यांमध्येही काम केलेलं आहे. शिवाय ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहत असतात. (Bharat Jadhav new Drama)