मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध ‘विनोदवीर’ म्हणून भरत जाधव यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. आजवर अनेक विनोदी भूमिकांच्या माध्यमातून भरत यांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे. विनोदी भूमिकांसाह त्यांनी अनेक गंभीर भूमिकाही केल्या आहेत. ‘जत्रा’, ‘गोलमाल’, ‘जबरदस्त’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘साडे माडे तीन’ अशा अनेक चित्रपटांत काम करत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर त्यांची ‘सही रे सही’, ‘ऑल द बेस्ट’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ यांसारखी अनेक नाटकंदेखील गाजली. अशातच त्यांचे ‘अस्तित्त्व’ हे नाटक नव्याने रंगभूमीवर आले आहे. (Bharat Jadhav On Instagram)
भरत जाधव सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ किंवा कामसंबंधीची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अशातच त्यांनी इनस्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. भरत यांनी वाढदिवसानिमित्त आई-वडिलांचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. स्टार प्रवाहवरील ‘सुप्रिया सचिन शो’ या कार्यक्रमात भरत यांनी त्यांच्या पत्नीसह हजेरी लावली होती. तेव्हा या कार्यक्रमात त्यांच्या आई-वडिलांनी भरत व त्यांच्या पत्नीचे कौतुक केले होते. याच खास आठवणींना उजाळा देत भरत यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये आई-वडिलांनी भरत यांचे खूप कौतुक केले आहे. त्याचबरोबर भरत हे त्यांच्या आई-वडिलांसाठी किती हळवे आहेत याचा एक किस्साही या व्हिडीओमध्ये आहे. त्यांच्या आईने हा किस्सा सांगितला आहे की, “एकदा मला बरं नव्हतं म्हणून सरिताचे चुलते-चुलती मला बघायला आले होते आणि तेव्हा भरत शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही सरिताला भरतला माझ्या आजारणाबद्दल काही सांगू नकोस असे सांगितले होते. पण केदारची बायको पुण्यात आली होती. तेव्हा तिने भरतला मला बरे नसल्याचे सांगितले. भरतला हे कळताच त्याने लगेच ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. मी शूटिंग नंतर करेन, पण मला आता माझ्या आईला बघायचं आहे असं म्हणून तो शूटिंगचे कपडे व मेकअप तसाच ठेवून मला भेटायला आला आणि घरी येताच त्याने मला घट्ट मिठी मारली. माझी तब्येत तेव्हा बरी असल्याचं त्याला सांगूनही तो धावत पळत आला. इतका तो भित्रा आहे.”
या व्हिडीओमध्ये आई-वडिलांना बोलताना पाहून भरत जाधव व त्यांची पत्नी खूपच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. इतरांना कायम हसवणाऱ्या या अभिनेत्याचे आई-वडिलांप्रती हे प्रेम व आदर पाहून नेटकऱ्यांनीदेखील भरत यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, भरत जाधव यांचा ‘लंडन मिसळ’ नावाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर रंगभूमीवर त्यांचे ‘अस्तित्त्व’ हे नाटकदेखील चालू आहे. या नाटकात त्यांच्याबरोबर अभिनेत्री चिन्मयी सुमितदेखील आहेत.