मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. मनोरंजन विश्वातील प्रसाद जवादे व अमृता देशमुख, सुरुची अडारकार व पियूष रानडे या जोड्या नुकत्याच विवाहबंधनात अडकल्या. नुकतंच ‘सारेगमप’ लिटिल चॅम्प्समधील गायिका मुग्धा वैशंपायनच्या मोठ्या बहिणीचे लग्नदेखील पार पडले. या लग्नाच्या तयारीमध्ये मुग्धा चांगलीच व्यस्त होती. ताईच्या हळदीचे, मेहंदीचे, ग्रहमख, लग्नाचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत होती. अशातच आता तिच्या लग्नाचीही तयारी सुरू झाली आहे. (Mugdha Bhagawan Vaishampayan On Instagram)
ताईच्या लग्नानंतर आता लवकरचं मुग्धादेखील बोहोल्यावर चढणार आहे. काही दिवसांपूर्वी मुग्धा व प्रथमेश यांनी सोशल मीडियावरून दोघांचा एकत्र फोटो शेअर करत ‘आमचं ठरलं’ असं म्हणत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. तेव्हापासून मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाकडे साऱ्यांचचं लक्ष लागून राहिलं आहे. मुग्धा व प्रथमेश यांच्या केळवणाचेही बरेच फोटो समोर आले. मुग्धा व प्रथमेश सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांचे अनेक खास क्षण ते सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करतात. अशातच आता त्यांचा आणखी एक फोटो समोर आला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मुग्धा व प्रथमेश यांनी इनस्टाग्रामवर दोघांचा एकत्र फोटो शेअर केला आहे. बहिणीच्या लग्नामध्ये मुग्धा-प्रथमेशने काही फोटो काढले होते. त्यापैकी हा एक फोटो आहे. या फोटोत प्रथमेशने पिवळ्या रंगाचा कुर्ता, तर मुग्धाने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. “तुम मिले तो लम्हे थम गए, तुम मिले तो सारे ग़म गए, तुम मिले तो मुस्कुराना आ गया” असं हटके कॅप्शन देत त्यांनी हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत दोघेही हसताना दिसत आहेत. या फोटोला त्यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, एका नेटकऱ्याने “हे सारखे दात काढत (हसत) का असतात?” अशी कमेंट केली आहे. त्याच्या या कमेंटला प्रथमेशनेही त्याच्या खास अंदाजात “तुम्हालाच हसत आहे” असं म्हणत उत्तर दिलं आहे.
दरम्यान, मुग्धा-प्रथमेशच्या लग्नासाठी त्यांचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत. गेले काही दिवस त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. मुग्धा व प्रथमेश यांच्या केळवणाचेही बरेच फोटो समोर आले. नुकतेच तिने सोशल मीडियावर ‘ब्राइड टू बी’ पार्टीचे फोटोदेखील शेअर केले होते. अशातच त्यांच्या या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.