मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे भरत जाधव. त्यांनी आजवर अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये नानाविध भूमिका करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. गंभीर, विनोदीसह अनेक प्रकारच्या भूमिकांद्वारे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. भरत यांनी आतापर्यंत खूप संघर्ष केला आहे. अनेक खडतर परिस्थितीतून यश संपादन केले आहे आणि या यशाचे श्रेय त्यांनी आईवडिलांना दिले आहे आणि हे अनेकवेळा त्यांनी जाहीरपणे सांगितलेही आहे. (Bharat Jadhav On Instagram)
भरत जाधव सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ किंवा कामसंबंधीची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अशातच त्यांनी इनस्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. काल (१२ डिसेंबर) रोजी भरत यांचा वाढदिवस होता. याच वाढदिवसानिमित्त त्यांनी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा खास व्हिडीओ त्यांच्या आईवडिलांचा आहे. “ज्यांच्यामुळे माझं अस्तित्त्व आहे असे माझे आई-अण्णा” असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – मेघा घाडगेवर रुग्णालयात उपचार सुरू, व्हिडीओ शेअर करत सांगितले आजाराचे कारण, म्हणाली, “हलगर्जीपणा झाला अन्…”
स्टार प्रवाहवरील ‘सुप्रिया सचिन शो’ या कार्यक्रमात भरत यांनी त्यांच्या पत्नीसह हजेरी लावली होती. तेव्हा या कार्यक्रमात त्यांच्या आई-वडिलांनी भरत व त्यांच्या पत्नीचे कौतुक केले होते. यात त्यांच्या वडिलांनी भरतचे कौतुक करत असे म्हटले आहे की, “भरत हा त्याच्या आई-वडिलांना खूप मानतो. आईला तर जास्तच मानतो. आमचा खूप आदर करतो. शूटिंगवरुन रात्री उशिरा आला तरी घरी येऊन आमचे पाय दाबतो. आमची काळजी घेतो. जेवण करायच्या आधी तो आमची तब्येत विचारतो. कोल्हापुरात आम्हाला आमचं घर पाहिजे होतं, तर त्याने नवीन घर बांधलं. शेती नव्हती, तर त्याने शेती विकत घेतली आणि आमची इच्छा पूर्ण केली. दर महिन्याला सगळा किराणा भरतो आणि दहा हजार रुपयेसुद्धा हातात देतो. मी त्याला नेहमी म्हणतो मला काय कमी नाही. आम्ही सुखात आहोत. पण त्याला नेहमीच आमची काळजी असते.” यापुढे भरत यांची आई म्हणते, “भरतने लहानपासूनच माझी खूप सेवा केली आहे. दळण आणून देणे, भाजी आणणे, दिवाळीत सर्वांना फराळ वाटणे किंवा कुठेही जायचं असेल तर तो नेहमीच माझ्याबरोबर यायचा. एकदा माझ्या तब्येतीबद्दल कळताच तो शूटिंग सोडू मला भेटायला आला. भरत हा आमच्याबद्दल आणि आमच्या तब्येतीबद्दल खूपच भित्रा आहे.”
यापुढे भरत यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या पत्नीचेदेखील खूप कौतुक केले. “ती त्याची उत्तम सेवा करते. भरत रात्री कितीही उशिरा आला तरीही ती त्याच्यासाठी थांबते. त्याची वाट बघते. ती त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे भरत आज इतका यशस्वी झाला आहे” असं म्हणत त्यांचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर भरतने असंच मेहनत करत पुढे जावे. आई-वडील म्हणून आम्ही कायम त्याच्याबरोबर आहोत. आमचा कायम त्याला आशीर्वाद असेल असं म्हणत भरत यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये भरत त्यांच्या आईवडिलांना पाहून खूपच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच या व्हिडीओखालीही नेटकऱ्यांनी भरत जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आई-वडिलांविषयी इतकं प्रेम व आदर पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे कमेंटमध्ये कौतुक केले आहे.