अभिनेत्री अमृता खानविलकरने आजवर तिच्या अभिनयकौशल्याने व तिच्या नृत्यकलेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अमृता नेहमीच तिच्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरून ती काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने तिला आलेल्या स्वामींच्या प्रचितीबाबत नुकतंच भाष्य केलं आहे. (Amruta Khanvilkar Shared Swami Incident)
अमृताने तिला आलेल्या स्वामींच्या प्रचितीबाबतचा एक किस्सा तिच्या युट्युब चॅनेलवरुन शेअर केला आहे. यांत तिने म्हटलं आहे की, “मी आणि हिमांशूने मध्यंतरी आमचं घर भाड्याने द्यायचा निर्णय घेतला. त्यानंतर ते घर कित्येक दिवस भाड्याने द्यायचं इतकंच सुरु होतं, पण कोणी ते घर भाड्याने घ्यायला येतंच नव्हतं. लॉकडाऊनमुळे त्याचा ईएमआय खूप भारी पडत होता, एक क्षण असा आला की ते ईएमआय भरणं कठीण झालं होतं. त्यानंतर आम्ही घर भाड्याने देण्याचा निर्णयावर पोहोचलो”.
यापुढे अमृता म्हणाली, “कुठेतरी आर्थिक अडचण कमी होईल म्हणून ते घर भाड्याने देण्याचा निर्णय आम्ही घेतला. घर भाड्याने देण्याबाबत आम्ही खूप एजंटला सांगितलं होतं. खूप लोक घरी येऊन बघत होते. पण ते घर जात नव्हतं. त्यामुळे दरमहा ईएमआय देणं कठीण होऊन बसलं होतं. त्यानंतर एक जोडपं आलं आणि दोन आठवड्यांनी त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचं घर घ्यायला आवडेल. तेव्हा आम्ही खूप खुश झालो. भाड्याचे जे पैसे येतील त्याने ईएमआय देता येईल. त्यानंतर रजिस्ट्रेशनची सुरुवात झाली. रजिस्ट्रेशनला गेलो तेव्हा माझ्या डोक्यात का आलं माहित नाही, मी त्यांना विचारलं तुम्हाला आमचं घर का घ्यावंसं वाटलं. गेले एक दीड वर्ष आम्ही भाडेकरू शोधत होतो, पण तो आम्हाला मिळतच नव्हतं. तेव्हा त्यांच्या पत्नीने मला सांगितलं की, तुमच्या मंदिरात स्वामी समर्थांचा फोटो होता. तो पाहून मी घर घ्यायचं ठरवलं”.
यापुढे अभिनेत्रीने सांगितलं, “त्याच्या आधी मला असं वाटतं होतं की, स्वामी कदाचित नाही आहेत माझ्याबरोबर वा ते माझ्याकडे लक्ष देत नाही आहेत. पण ज्या क्षणी त्यांनी स्वामींचा फोटो पाहून घर घेतलं हे सांगितलं तेव्हा सगळ्या शंका दूर झाल्या. जेव्हा मला खरोखरच गरज होती तेव्हा स्वामी माझ्या पाठीशी होते, तेव्हा मी शंका घेतली. मात्र त्या शंकेचं निरसनही स्वामींनीच केलं. त्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्येच मला रडू कोसळलं” असंही ती म्हणाली.