Badlapur School Case : कोलकाता येथे ट्रेनी डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच हृदय पिळवटून टाकणारी आणखी एक घटना समोर आली आहे. कोलकाता प्रकरणातून देश सावरतो ना सावरतो तोपर्यंत बदलापूरमधील एका घटनेने पुन्हा एकदा सर्वांना धक्का बसला आहे. बदलापूरातील एका नामांकित शाळेत तीन ते साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बदलापूरसह अवघा महाराष्ट्र हादरला आहे. कोलकातामधील डॉक्टर महिलेच्या प्रकरणावर बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी संतापजनक पोस्ट शेअर केल्या होत्या. (Badlapur School Case News)
अशातच बदलापूरमधील घटनेवरही मराठी कलाकारांकडून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मराठीतील अनेक कलाकार मंडळींकडून या घटनेबद्दल सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला आहे. मराठी अभिनेत्री सुरभी भावेने याबद्दल इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली असून या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “बदलापूरमध्ये साडे तीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाला आहे. एका मुलीची आई म्हणून जीव टांगणीला लावेल असा हा प्रसंग आहे. माणूसकीचा अंत होत आहे हे निश्चित. त्या पालकांवर काय प्रसंग ओढावला असेल याची कल्पनासुद्धा करवत नाहीये. या अशा आरोपींना या देशात थेट फाशीची शिक्षा कधी होईल देव जाणे”.
आणखी वाचा – Video : ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीने खरेदी केली महागडी कार, कुटुंबियांबरोबर पूजा आणि जल्लोष, व्हिडीओ व्हायरल
अभिनेता अभिजीत केळकरनेही या प्रकरणावर त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “जे कृत्यच पाशवी, अमानवी आहे, त्याला शिक्षा तरी अमानवी का असावी?” अशी पोस्ट शेअर करत त्याने बदलापूर प्रकरणावर आपला राग व्यक्त केला आहे. तसंच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विनोदी अभिनेत्री शिवाली परबनेही यावर भाष्य केलं आहे. बदलापूरमधील बलात्कार घटनेचे वृत्त शेअर करत या प्रकरणी राग व्यक्त केला आहे. अभिनेता प्रसाद ओकनेदेखील या घटनेवर आरोपीला शिक्षा देण्याची व पीडितेच्या न्यायाची मागणी केली आहे.
दरम्यान, बदलापूरमधील या घटनेनंतर नागरीक संतप्त झाले असून त्यांनी आज बदलापूर बंदची हाक दिली आहे. संतप्त नागरीकांनी व आंदोलकांनी रेल्वे रोको आंदोलन केले आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी बदलापूर स्थानकात रेल्वे रुळावर उभे राहून घोषणा देऊन आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनामुळे या मार्गावरची सेवाही ठप्प झाली आहे. सध्या पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात असून रेल्वे सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.