‘दंगलगर्ल’ अशी ओळख असणाऱ्या मोठ्या पडद्यावरील छोट्या बबिताचे म्हणजे अभिनेत्री सुहानी भटनागरचे १६ फेब्रुवारीला निधन झाले. सुहानीच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. उपचारादरम्यान औषधांच्या दुष्परिणामांमुळे सुहानीला जीव गमवावा लागला. सुहानीच्या मृत्यूच्या बातमीनंतर अभिनेता आमीर खान, सान्या मल्होत्रा, अपारशक्ती खुराना तसेच इतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली होती. १९ फेब्रुवारीला सुहानीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी फरीदाबाद येथील सुहानीच्या राहत्या घरी शोकसभा ठेवण्यात आली होती. या शोकसभेला महिला कुस्तीपटू बबिता फोगट उपस्थित होती. (Babita phogat post)
कुस्तीपटू बबिताने शोकसभेदरम्यानचे दोन फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये बबिता फोटोसमोर हात जोडून सुहानीसाठी प्रार्थना करत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये बबिता सुहानीच्या आईवडिलांसह उभी आहे. सुहानीच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर मुलीला गमावल्याचे दुःख दिसत आहे. सुहानीचे फोटो शेअर करताना बबिताने आपल्या पोस्टला भावुक कॅप्शन दिले आहे. बबिताने लिहिले आहे की, “‘दंगल’ चित्रपटामध्ये माझ्या लहानपणीची भूमिका साकारणाऱ्या सुहानी भटनागरच्या फरिदाबाद येथील घरी जाऊन तिला श्रद्धांजली अर्पण केली. तसेच तिच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि तिच्याप्रती असलेल्या आपल्या संवेदना व्यक्त केल्या. ओम शांती”.
सुहानीच्या निधनानंतर बबिताने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. बबिताने सुहानीचे फोटो शेअर करत लिहिले होते की, “दंगल चित्रपटामध्ये माझ्या लहानपणीची भूमिका साकारणाऱ्या सुहानीच्या इतक्या कमी वयात जगाचा निरोप घेणे हे अत्यंत दुःखद आहे. ती आपल्याला सोडून गेली यावर माझा विश्वास बसत नाही. ईश्वर तिच्या आत्म्याला शांती देवो. तसेच दुःखाच्या प्रसंगी तिच्या परिवाराला व चाहत्यांना हे दुःख पचवण्याची हिम्मत मिळो. ओम शांती”, असं तिने या पोस्टद्वारे म्हटलं होतं.
‘दंगल’ चित्रपटामध्ये छोट्या बबिताची भूमिका केल्यानंतर सुहानी प्रकाशझोतात आली होती. पण सुहानी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. २०२१ नंतर तिने इंस्टाग्रामवर कोणतेही फोटो पोस्ट केले नाहीत. चित्रपटानंतर सुहानीने काही फोटो अपलोड केले ज्यामध्ये सुहानीचा पूर्णतः वेगळा लूक पाहायला मिळल होता. ‘दंगल’ या चित्रपटवेळी सुहानी १४ वर्षांची होती.