आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्हीवरील मालिका गाजवणारे अतुल परचुरे यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. यावर त्यांनी यशस्वी मात करत रंगभूमीवर पुनरागमनदेखील केले होते. मात्र पुन्हा बळावलेल्या आजारामुळे या हरहुन्नरी कलाकाराची प्राणज्योत मालवली. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. (Atul Parchure Death)
अतुल यांच्या निधनाने केवळ मराठी मनोरंजन सृष्टीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातूनही दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांच्यावर आज दादरमधील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडले असून यावेळी मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी अतुल यांना शेवटचे पाहण्यासाठी उपस्थिती लावली होती. तेव्हा अनेकांना अश्रुही अनावर झाले. यावेळी मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
अतुल यांच्या निधनावर प्रतिक्रिया देत श्रेयसने असं म्हटलं की, “कॉलेजमध्ये असल्यापासून नाटक आणि एकांकिकांशी संबंध आला तेव्हा. अतुल परचुरे हे नाव खूप मोठे होते. त्यामुळे त्याच्यासारखं काय करता येईल का? यांचा विचार आम्ही करायचो. त्याचं विनोदाचं टायमिंग, त्याचं पाठांतर, त्यांची शैली अशा अनेक गोष्टी आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊन आम्ही एकत्र काम केलं. अशातच त्यांचं हे झालं आणि हे खूप धक्कादायक होतं. एवढ्या मोठ्या आजारातून ते लढून बाहेर आले होते. त्यामुळे ते आमच्यासाठी एक प्रेरणा होते. पण ते आपल्यातून अचानक निघून जाणे हे खूप दुर्दैवी आहे. ते जिथे कुठे असतील तिथून ते सर्वांना हसवत असतील असा मला विश्वास आहे.”
आणखी वाचा – Atul Parchure Death : अतुल परचुरेंना अखेरचा निरोप देण्यासाठी राज ठाकरे यांची उपस्थिती, भावुक व्हिडीओ समोर
यापुढे त्याने असं म्हटलं की, “मी देवाकडे प्रार्थना करतो की, देव त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो. कारण हा खूप मोठा धक्का आहे. सिनेसृष्टीसाठी हा खूप मोठा धक्का आहे आणि त्यांच्या जाण्याने सर्वांनाच खूप वाईट वाटत आहे”. दरम्यान, अतुल परचुरे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. या जीवघेण्या आजारावर त्यांनी यशस्वीपणे मात केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली.
आणखी वाचा – Video : अतुल परचुरेंना शेवटचे पाहताना ढसाढसा रडल्या सुप्रिया पाठारे, डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ समोर
‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातून अतुल परचुरे रंगभूमीवर झळकणार होते, पण अचानक त्यांचे निधन झाले आहे. परचुरे यांनी साकारलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. पु. ल. देशपांडे यांच्यासमोर त्यांचीच व्यक्तिरेखा ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकात उत्तम पद्धतीने साकारली. त्यांचा ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ हा शेवटचा चित्रपट होता.