Actor Atul Parchure Died : मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. परचुरे यांच्यावर आज मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. नाटक,सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती. आज हा हरहुन्नरी कलाकार आपल्यात नसल्याचं दुःख साऱ्यांना होतं आहे. कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अतुल परचुरे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
मुंबईतील शिवाजी पार्क दादर हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अतुल यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कुटुंबीयांना तसेच कलाविश्वात कलाकारांनाही अश्रू अनावर झाले. अतुल यांना शेवटचा निरोप देताना निवेदिता सराफ यांना अश्रू अनावर झाले. अतुल यांना नमस्कार करताना त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. निवेदिता यांच्याबरोबरच वंदना गुप्ते, सविता मालपेकर या कलाकारांनाही अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.
अतुल यांच्याबद्दल बोलतानाही निवेदिता यांना रडू आवरलं नाही. इट्स मज्जाशी संवाद साधताना निवेदिता यांचे डोळे पाणावले. त्या म्हणाल्या, “मी काय बोलू हे मला कळत नाही आहे. माझा खूप चांगला मित्र गेला. आमच्या दोघांच्या करिअरची सुरुवात एकत्र झाली होती. तो लढवय्या होता. इतक्या मोठ्या आजाराशी त्याने झुंज दिली. त्यातून तो बरा झाला आणि त्याने कार्यक्रम केला. अशाप्रकारचे रोल्स आता कोणी करु शकणार नाही असं मला वाटतं. शेवटी गणपतराव परचुरेंचा नातू होता”.
पुढे त्या असंही म्हणाल्या की, “अजूनही मला विश्वास बसत नाही आहे की अतुल आपल्यात नाही आहे. गेली २०-२५ दिवस तो खूप आजारी होता. त्याची अवस्था वाईट झाली होती पण कधी असं होईल असं वाटलं नव्हतं. कारण या आधीच्या आजारातून तो बाहेर पडला होता. त्याची इच्छाशक्ती खूप स्ट्रॉंग होती. माझं तर वैयक्तिक नुकसान झालं आहे कारण माझा खूप चांगला मित्र मी गमावला आहे. त्याहीपेक्षा अगदी नाट्यसृष्टी, टेलिव्हिजन सृष्टी, चित्रपटसृष्टी या सगळ्याच खूप मोठं नुकसान झालं आहे. इतका छान आणि हरहुन्नरी कलाकार आपल्यातून गेला”.