Actor Atul Parchure Died : अभिनेते अतुल परचुरे यांनी सोमवार १४ ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमांमधून त्यांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. कर्करोगावर मात करत त्यांनी अभिनयक्षेत्रात नाटकाद्वारे कमबॅकही केलं. मात्र गेले दोन आठवडे अतुल यांची तब्येत खालावली. अतुल परचुरे यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातूनही शोक व्यक्त केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. फेसबुकवर मोठी पोस्ट शेअर करत त्यांनी अतुल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Atul Parchure Death)
अतुल परचुरे यांनी राज ठाकरे हे शाळेतले मित्र होते. तेव्हापासूनची मैत्री ही अगदी आतापर्यंतच्या कठीण काळातही पाहायला मिळाली. अतुल परचुरे यांचं महाविद्यालयीन शिक्षण हे रुपारेल महाविद्यालयातून झालं. पण त्यांनी राज ठाकरेंबरोबर बालमोहन शाळेतून शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे त्यांची मैत्री ही अगदी शाळेपासूनच होती. अतुल यांना आज शेवटचा निरोप दिला जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरे आपल्या लाडक्या मित्राच्या शेवटच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. राज ठाकरे अतुल यांच्या अंत्यदर्शनाला गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये राज ठाकरे अतुल यांना शेवटचा निरोप देताना भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आपल्या लाडक्या मित्राला अखेरचा निरोप देताना त्यांना अश्रु अनवार झाले आहेत. अतुल परचुरे यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी दुःख व्यक्त केले. आज (मंगळवार १५ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दरम्यान, आपल्या बहारदार अभिनयाच्या जोरावर मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्हीवरील मालिका गाजवणारे अतुल परचुरे यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. यावर त्यांनी यशस्वी मात करत रंगभूमीवर पुनरागमनदेखील केले होते. मात्र पुन्हा बळावलेल्या आजारामुळे या हरहुन्नरी कलाकाराची प्राणज्योत मालवली. अतुल यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वावरही शोककळा पसरली आहे.