मराठी नाटक व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे एव्हरग्रीन अभिनेते म्हणजे अशोक शिंदे, नाटक, चित्रपटांमधून अशोक शिंदे यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यानंतर अशोक शिंदे यांनी आपला मोर्चा मराठी मालिकांकडे वळवला. सध्या ते झी मराठी वहिनीवरील ‘सारं काही तिच्याचसाठी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील अनेक ट्विस्ट्समुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या मालिकेत अनेक ट्विस्ट येत असतात.
अशातच नुकताच मालिकेत गोदामाला आग लागण्याचे दृश्य पाहायला मिळाले. यावेळी उमा, रघुनाथ यांनी प्रसंगवधान राखत अत्यंत शिताफीने हा प्रसंग हाताळला असल्याचे पाहायला मिळाले. मालिकेतील हा नवीन ट्विस्ट् प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. याच निमित्ताने मालिकेतील रघुनाथ म्हणजेच अभिनेते अशोक शिंदे यांनी ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी खऱ्या आयुष्यात आलेल्या आगीच्या एका भयानक प्रसंगाचा अनुभव शेअर केला आहे.
या प्रसंगाबद्दल सांगताना त्यांनी असं म्हटलं की, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात असा प्रसंग घडला नाही. पण मी १९९४-९५ मध्ये ‘सासर माहेर’ या चित्रपटाचे शूटिंग करत होतो. या चित्रपटात अशोक सराफ, जयश्री गडकर, निशिगंधा वाड, बाळ धुरी यांसह मी होतो. यावेळी या चित्रपटात माझे आई-वडील सुनेला जाळून मारतात असा सीन होता. त्यावेळी इतक्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे एक पेट्रोलियम जेली टाकून आग लावली जायची आणि ती विझवली नाही, तर अवघ्या काही सेकंदात त्या कपड्याला आग लागायची. तेव्हा हा सीन शूट करताना फायटर मास्टरच्या असिस्टंटला आग लागली होती”.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “यादरम्यान, मी या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत होतो. तेव्हा या सीनमध्ये मीसुद्धा होतो. मी सिल्कची लुंगी व शर्ट घातला होता. तर त्या असिस्टंटला लागलेल्या आगीच्या झळा इतक्या होत्या की, त्यामुळे माझे कपडेही पेटले. सुदैवाने मी वाचलो. तेव्हा सेटवर अगदी धूर धूर झाला होता. पण तेव्हा अगदी क्षणात आगीमुळे आपली त्वचा कशी विरघळते हे मी पहिलं होतं. त्यामुळे आगीबाबत माझा हा अनुभव आहे”.
दरम्यान, ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत असून मालिकेतील नवनवीन ट्विस्ट चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच मालिकेत पार पडलेला आगीचा सीनही चाहत्यांना चांगलाच आवडला असल्याच्या अनेक प्रतिक्रिया आल्याचे पाहायला मिळाले.