अभिनेत्री खुशबू तावडे हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. आतापर्यंत ती विविध मालिकांमधून झळकली. तर सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेमुळे खुशबू चांगलीच चर्चेत आहेत. मलिकेतील नवनवीन ट्विस्ट्समुळे ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका झाली आहे. नुकताच या मालिकेत गोदामाला आग लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
मालिकेतील हा नवीन ट्विस्ट् प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. याच निमित्ताने मालिकेतील उमा म्हणजेच अभिनेत्री खुशबू तावडेने ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधला. यावेळी खुशबूला तिच्या खऱ्या आयुष्यातली आगीच्या अनुभवाविषयी प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत खुशबूने असं म्हटलं की, “हो मी माझ्या खऱ्या आयुष्यात आग अनुभवली आहे. नुकताच माझ्या आयुष्यात एक प्रसंग घडला. माझ्या नवीन बिजनेस सेटअपला आग लागली होती”.
आणखी वाचा – ‘दंगल’मधील छोट्या बबीता फोगटच्या निधनानंतर तिच्या घरी पोहोचला आमिर खान, ‘ती’ एक गोष्ट घेऊन गेला अन्…
“मी नुकताच माझा बिजनेस सेटअप सुरु केला होता आणि या बिजनेस सेटअपला आग लागली होती. कुणाच्यातरी चुकीमुळे मीटररूमला आग लागली होती. मी सगळं बंद करून घरी आले होते, त्यानंतर मला आग लागल्याचा कॉल आला होता. त्यानंतर मी तिथे जाईपर्यंत आग विझली होती. पण मी त्या आगीच्या धुराचे अनेक लोट पाहिले. संपूर्ण टॉवर्सचे लाईट्स गेले होते. मी तिथे गेली तेव्हा अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या लागल्या होत्या. आपल्या प्रॉपर्टीच्या बाहेर अनेक लोक जमले होते. तुम्हाला तिथे प्रवेश दिला जात नाही. काही नुकसान झालं आहे की नाही हे पाहायलादेखील जाऊ दिलं गेलं नाही. त्यामुळे ती परिस्थिती समजू शकते. आजही कधी मला तो प्रसंग आठवला तर धडकी भरते”.
दरम्यान, मालिकेतील आगीचा हा प्रसंग पाहून अनेक प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. अशातच अभिनेत्रीने तिच्या खऱ्या आयुष्यातील सांगितलेला आगीचा हा प्रसंगदेखील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे.