“कसं काय मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे” असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राला हास्यपर्वणी घडवणारा कलाकार म्हणजे डॉ. निलेश साबळे आणि ज्या कार्यक्रमामुळे निलेश अवघ्या घराघरात लोकप्रिय झाला तो कार्यक्रम म्हणजे झी मराठी वहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’. गेल्या १० वर्षांपासून हा कार्यक्रम महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे. लवकरच या कार्यक्रमाचा १०००वा भाग प्रसारित होणार आहे. अशातच आता या कार्यक्रमाचा दिग्दर्शक व निवेदक डॉ. निलेश साबळेने या कार्यक्रमातून निरोप घेतला असल्याचं समोर आलं आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे निलेश साबळे घराघरांत पोहोचला. पण आता यापुढे तो या कार्यक्रमाचा भाग नसणार आहे. याबद्दल ‘एबीपी माझा’शी बोलताना निलेश साबळे असं म्हणाला की, “चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि मी या कार्यक्रमाचा एक भाग होतो याचा मला प्रचंड अभिमान आहे. आता काही कारणास्तव मी या कार्यक्रमाचा भाग नसणार आहे. त्यामुळे नुकताच मी या शोमधून बाहेर पडलो आहे आणि याचं कारण म्हणजे मला काही नवीन गोष्टी करायच्या आहेत”.
आणखी वाचा – ‘दंगल’मधील छोट्या बबीता फोगटच्या निधनानंतर तिच्या घरी पोहोचला आमिर खान, ‘ती’ एक गोष्ट घेऊन गेला अन्…
यापुढे त्याने असं म्हटलं की “सध्या माझं एका चित्रपट व वेबसीरिजचं काम सुरु आहे आणि माझी तब्येत हेदेखील एक मुख्य कारण आहे. गेले काही दिवस माझ्या तब्येतीच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत. तर या साऱ्या कारणास्तव मी या शोमधून बाहेर पडलो आहे.” यापुढे निलेशने त्याच्या आगामी कामाबद्दल असं म्हटलं की, “सध्या माझी एका कार्यक्रमातून बाहेर पडलो असलो तरी लवकरच मी नवीन काहीतरी घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. मग तो चित्रपट असेल, नाटक असेल किंवा काहीही असेल. तुम्ही आतापर्यंत जे काही अनुभवलं होतं, त्याहीपेक्षा काहीतरी चांगलं आणि छान मी प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे”.
दरम्यान, विनोदाचं कमाल टायमिंग आणि प्रेक्षकांना खूर्चीला खिळवून ठेवणारा विनोदवीर अशी डॉ. निलेश साबळेची ओळख आहे. पण तो आता या कार्यक्रमाचा भाग नसल्याने त्याचे अनेक चाहते नाराज झाले आहेत. तर आगामी काळात निलेश प्रेक्षकांसमोर कोणत्या नवीन भूमिकेत किंवा कोणत्या नवीन कार्यक्रमातून भेटीला येणार? याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.