‘चला हवा येऊ द्या’ म्हटलं की, डोळ्यासमोर भाऊ कदमचं नाव उभं राहतं. या कार्यक्रमामधून प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात भाऊ यशस्वी ठरला. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्याचे चाहते आहेत. मराठीसह बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांकडून भाऊला शाबासकीची थाप मिळाली. मराठीतील सुप्रसिद्ध कलाकारांच्या यादीमध्ये आता त्याचाही समावेश झाला आहे. फक्त कलाकार म्हणूनच नव्हे तर व्यक्ती म्हणूनही भाऊ तितकाच उत्तम आहे. याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ व भाऊची झालेली भेट.
अशोक सराफ यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. आजही त्यांचे चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. शिवाय अशोक मामांना एकदा तरी भेटावं अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. भाऊची हिच इच्छा पूर्ण झाली. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अशोक मामा आले असताना भाऊ व त्यांची भेट झाली. पण त्यानंतरही या दोघांची झालेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
भाऊने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भाऊ अशोक मामांना भेटायला आलेला दिसत आहे. अशोक मामांना पाहताच भाऊ त्यांच्या पाया पडतो. अशोक मामा सोफ्यावर बसून त्याची विचारपूस करतात. तर भाऊ त्यांच्या समोर अगदी नम्रपणे उभा असलेला दिसत आहे. अशोक मामांनी विचारपूस करुन झाल्यावर तिथून निघताना भाऊ पुन्हा एकदा त्यांच्या पाया पडतो.

हा संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना दोन कलाकारांना एकत्र पाहिल्याचा आनंद झाला. शिवाय भाऊच्या चेहऱ्यावरही अशोक मामांना भेटल्याचा आनंद आहे. पण या व्हिडीओनंतर अशोक मामांबाबत काहींनी नकारात्मक कमेंट केल्या आहेत. इथे बस असंही म्हणाले नाहीत मग हा कसला मोठा माणूस, भाऊ ये बस, चहा-कॉफी घेणार की नाही असंही विचारलं नाही, पाहुणचार केला नाही असं कुठे असतं का? अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अशोक मामा भाऊशी जे वागलं ते नेटकऱ्यांना पटलं नसल्याचं यामधून दिसून आलं.