छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे अर्जुन बिजलानी. अर्जुनने अनेक टीव्ही मालिकांमधून अभिनय करत चाहत्यांच्या हृदयात त्याचे विशेष स्थान निर्माण केले आहे. अशातच काल अर्जुन बिजलानीची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या तब्येतीबद्दलची माहिती दिली होती.
अर्जुनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याच्या हाताला सलाईन लावल्याचे दिसत होते. आपल्या हाताला सलाईन लावलेला फोटो शेअर करत त्याने “जे होतं ते चांगल्यासाठीच होतं” असंही लिहिलं होतं. त्यामुळे त्याचे अनेक चाहते चिंतेत पडले होते. अशातच आता अर्जुनच्या पत्नीने त्याच्या तब्येतीबद्दलची माहिती दिली आहे.

अर्जुनची पत्नी नेहा स्वामीने चाहत्यांना अभिनेत्याबद्दलच्या तब्येतीबद्दल माहिती देत असं म्हटलं आहे की, “अर्जुनची शस्त्रक्रिया चांगली झाली यासाठी मी डॉक्टर आणि देवाची खूप आभारी आहे. या कठीण काळात त्याच्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल त्याच्या सर्व चाहत्यांचे आणि जवळच्या लोकांचे आभार… प्रत्येकाच्या प्रार्थना आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. खूप खूप धन्यवाद. ओम गं गणपतय नम:”
पोटात दुखू लागल्याने अर्जुन बिजलानीला काल (९ मार्च) रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अभिनेत्याच्या पोटात अचानक अपेंडिसिटिसचा त्रास झाला. त्यामुळे पिंकविलाच्या वृत्तानुसार, अर्जुनला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आणि आता तो उत्तम असल्याची माहितीही त्याच्या पत्नीने दिली आहे.
आणखी वाचा – “आम्ही गुपचुप लग्न…”, आदिल खानबरोबरच्या नात्याबद्दल सोमी खानची प्रतिक्रिया, म्हणाली, “नकारात्मकता, वाद…”
दरम्यान, अर्जुन हा अभिनेता असण्याबरोबर एक उत्तम सूत्रसंचालकही आहे. अर्जुनने ‘जब हम तुम’, ‘इश्क में मरजावां’ तसेच ‘कवच’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमधून काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. याव्यतिरिक्त अर्जुन ‘झलक दिखला जा 9’, ‘खतरों के खिलाडी 11’ मध्ये दिसला आहे. याशिवाय त्याने ‘डान्स दिवाने’ हा शोचे सूत्रसंचालनही केले आहे.