राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खानने नुकतेच ‘बिग बॉस १२’ फेम सोमी खानशी लग्न केले आहे. सोमीच्या होम टाऊन जयपूरमध्ये दोघांचे लग्न झाले आणि त्यानंतर दोघेही त्यांच्या रिसेप्शनसाठी बेंगळुरूला गेले. त्यांच्या या लग्नामुळे सोशल मीडियावर सध्या अनेक चर्चा होत आहेत. अशातच सोमी खानने तिच्या आदिल खान दुर्रानीबरोबरच्या नात्यावर भाष्य केले आहे. एका मुलाखतीत सोमीने त्यांच्या नात्याबद्दल व त्यांच्या नात्यावर कुटुंबियांची नेमकी काय प्रतिक्रिया होती, याबद्दल सांगितले.
यावेळी सोमी खानने असं म्हटलं की, “आमचे लग्न ३ मार्चला झाले होते, आम्ही शूटिंगदरम्यान भेटलो होतो. पण त्याआधी आम्ही एका अवॉर्ड शोमध्ये पहिल्यांदा भेटलो आणि आम्ही एकमेकांना ओळखून आता ७ महिने झाले आहेत. आम्ही सुरुवातीला मित्र झालो आणि नंतर आमच्यात एकमेकांबद्दल प्रेमभावना निर्माण झाली आणि मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला”.
आदिलबरोबर लग्न करण्याबाबत सोमी म्हणाली, “आम्ही आमचे लग्न लपवले नाही. आम्हाला लग्न करायचं होतं, पण ते खाजगी ठेवायचं होतं. आम्हाला कोणतीही नकारात्मकता, वाद किंवा प्रसिद्धीचा स्टंट नको होता. आम्हाला ते फक्त आमच्या कुटुंबापुरतेच मर्यादीत ठेवायचे होते. त्यामुळे आमच्या पालकांनी लग्नाचा दिवस निश्चित केला आणि त्या दिवशी आमचे लग्न झाले”.
यापुढे सोमी आदिलबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल असं म्हणाली की, “मला आदिलचा भूतकाळ माहीत आहे. पण आता आम्ही दोघेही आमच्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला निघालो आहोत. त्यामुळे मला मागे वळून बघायचे नाही. तो त्याचा भूतकाळ होता आणि तो आता संपला आहे. मला आदिलचा भूतकाळ बघायचा नसून मी फक्त आदिलबरोबर माझे भविष्य पाहत आहे”.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर आदिल खान व सोमी खानच्या लगाच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. काही काळापूर्वी दोघांनी दुबईत एक म्युझिक व्हिडीओ शूट केला होता, तेव्हापासून त्यांच्यात जवळीक वाढली आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.