झी मराठी या वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. या मालिकेतील छोट्या अमोलपासून सगळीच पात्रे प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. सध्या मालिकेत लहानग्या अमोलच्या आजारपणाचे कथानक पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमोलला एक गंभीर आजार झाला असून याबद्दल् तो आधी कुणालाच काही सांगत नाही. पण अप्पी-अर्जुन यांना कालांतराने त्याच्या आजारपणाबद्दल माहीत होतं. मग ते त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात करतात. अशातच गेल्या काही भागांमध्ये अमोल त्याच्या आजारपणाला मोठ्या धाडसाने सामोरे जाण्याचे ठरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Appi Amchi Collector Serial Updates)
नुकतंच अमोलच्या आजारपणातील उपचारांमुळे केमोथेरपीचा डोस दिला गेला आणि यामुळे अमोलचे केस गळत असल्याचे घरातील सर्वांच्या लक्षात येते. यावेळी अर्जुन म्हणतो, “केमोथेरपीचा डोस दिल्यामुळे अमोलचे केस गळणार.” मग अप्पी म्हणते, “अमोलचे केस कमी करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय”. यावर अमोल मोठ्याने म्हणतो, “नाही कापायचे केस माझे, नाही कापायचे”. पण मग वडील, मामा, काका, दोन्ही आजोबा असे सगळे केस कापायला बसलेले पाहून अमोलला धीर येतो आणि तो “आता मी या आजाराला हरवणार” असं म्हणतो.
अशातच आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये डॉक्टर असं म्हणतात की, “मला अमोलच्या आजारपणाबद्दल थोडं सांगायचं आहे”. यावर अर्जुन म्हणतो की, “काय झालं डॉक्टर? काही गंभीर आहे का?”. यावर डॉक्टर असं म्हणतात की, “आपण अमोलवर केमोथेरपी सुरु केली आणि आजच निदान झालं की त्याचा हा आजार तिसऱ्या स्टेजला आला आहे”. मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांना आवडला नसून त्यांनी या प्रोमोखाली कमेंट्समध्ये तशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा – The Great Indian Kapil Show मध्ये आठ वर्षांनी गोविंदा व कृष्णा अभिषेक पुन्हा एकत्र, अखेर कौटुंबिक वाद मिटले?
या प्रोमोखाली एकाने “अरे त्या छोट्या मुलाला तरी सोडा रे… असं वाईट नका दाखवू. तो खूप लहान आहे. मालिकेमध्ये मध्ये हे पात्र करता करता त्याच्या खऱ्या आयुष्यावर याचा परिणाम होता कामा नये. त्याचं वय बघता त्याला या सगळ्या गोष्टी माहितीसुद्धा नसतील. तुम्हाला दाखवायचं आहे तर चांगलं दाखवा” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “कृपया अमोलला लवकर बरं करा” अशी कमेंट केली आहे. त्याचबरोबर आणखी एकाने “किती वाईट दाखवत आहेत, नको वाटत आहे बघायला” अशी कमेंट केली आहे. एकूणच मालिकेचे ही नवीन कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले नाही.