गोविंदा व त्याचा भाचा कृष्णा अभिषेक नेहमीच त्यांच्या नात्यामुळे आणि नात्यातील वादामुळे चर्चेत असतात. गोविंदा व कृष्णामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काही कौटुंबिक मतभेद सुरु आहेत. हे मतभेद इतक्या टोकाचे आहेत की गेल्या काही वर्षांपासून दोघं एकमेकांच्या संपर्कात आलेले नाहीत. मात्र काही दिवसांपूर्वी गोविंदाला बंदुकीची गोळी लागली होती. तेव्हा कृष्णा अभिषेक हा त्याच्या मामाला भेटण्यासाठी गेला होता. त्यानंतरही या दोन्ही कुटुंबांधील तणावाच्या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या. अशातच आता बॉलिवूड अभिनेता गोविंदा कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणार आहे. (Govinda and Krishna Abhishek Together)
कपिल शर्माच्या शोमध्ये गोविंदा त्याचा भाचा कृष्णा अभिषेकबरोबर दिसणार आहे. मधल्या काळात झालेल्या मतभेदानंतर गोविंदा कपिल शर्मा शोमध्ये भाचा कृष्णा अभिषेकबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. कृष्णा अभिषेक आणि गोविंदासाठी सर्वात खास क्षण आला आहे. काही वर्षांपूर्वी कृष्णाने ‘द कपिल शर्मा शो’च्या एका भागात सहभागी होण्यास नकार दिला होता. कारण त्या भागात त्याचा मामा गोविंदा आणि मामी सुनीता आहुजा हजर राहणार होते. त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्यात भांडण होते. पण आता मामा-भाच्याची जोडी याच शोमध्ये पुन्हा एकत्र येणार आहे.
शनिवारी पार पडलेल्या एपिसोडनंतर आगामी भागाचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये गोविंदा त्याचे मित्र चंकी पांडे आणि शक्ती कपूर यांच्याबरोबर दिसला. या प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आले की, कृष्णा त्याच्या मामाचे खुल्या हातांनी स्वागत करतो आणि त्यांच्यातील भांडण संपल्याची पुष्टी करतो. मग दोघेही एकत्र डान्स करतात. गोविंदाला मिठी मारण्यापूर्वी कृष्णा म्हणतो की, “आम्ही तब्बल दोन वर्षांनी भेटलो आहोत. त्यामुळे आता मी तुला कधीच सोडणार नाही”.
यादरम्यान, कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंह प्रेक्षकांमध्ये बसलेली दिसली. गोविंदा व कृष्णा अभिषेक यांना एकत्र पाहून तिला अश्रू आवरता आले नाहीत आणि ती भावूक झाली. कृष्णा अभिषेक आणि त्याचा मामा गोविंदा यांच्यात २०१६ मध्ये वाद झाला. वादाचे कारण, कृष्णाने त्याच्या शोमध्ये एक विनोद केला, जो गोविंदाला आक्षेपार्ह वाटला. त्यानंतर कृष्णाची पत्नी कश्मिरा शाहने केलेल्या ट्विटनंतर तणाव वाढला होता. यानंतर वर्षानुवर्षे, दोघांनी प्रसारमाध्यमांद्वारे तक्रारी प्रसारित केल्या, ज्यामुळे मतभेद अधिकच वाढले. पण आता हे दोघे एकत्र आल्याने चाहत्यांमध्ये आनंदांचे वातावरण आहे.