Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ हे यंदाच पर्व विशेष गाजलं. यंदाच्या या पर्वात सूरज चव्हाणने बाजी मारलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर सूरज चव्हाणने आपलं नाव कोरले आणि त्याचं नाव उंचावलं. सबंध महाराष्ट्रातून सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. केवळ मनोरंजन क्षेत्रातूनच नव्हे तर राजकीय क्षेत्रातूनही सूरजचं भरभरुन कौतुक होताना पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसह आता सूरज त्याच्या गावी बारामतीत रवाना झाला आहे. बारामतीमध्ये पोहोचताच सर्व बारामतीकरांनी सूरजचं भरभरुन कौतुक केलेलं पाहायला मिळाले. अगदी जल्लोषाल ढोल- ताशांच्या गजरात त्याचं स्वागत झालेलं दिसलं.
‘बिग बॉस’च्या घरात असताना कायमच वाद, भांडण ही होताना पाहायला मिळाली. आता घरातून बाहेर पडूनही या स्पर्धकांचं स्वागत होताना पाहायला मिळत आहे. मात्र सलग दोन दिवस सूरजसाठी प्रेक्षकांचं प्रेम पाहता आता त्याला मानसिक दृष्ट्या आरामाची आवश्यकता आहे हे विसरुन चालायचं नाही. यावरुन आता अंकिता वालावलकरने केलेली कमेंट लक्षवेधी ठरतेय. अंकिता ‘बिग बॉस’च्या घरातही सूरजला वेळोवेळी सल्ला देताना दिसली. इतकंच नव्हे तर अनेक गोष्टी ती त्यांना शिकवताना देखील दिसली.
अंकिताची ही गोष्ट अनेकांना खटकली. सूरजला शिकवण्यामागे अंकिताचा कोणताच वाईट हेतू नव्हता. तरीदेखील अंकिताने सूरजचा वापर हा सहानुभूतीसाठी केला असल्याचं अनेकांनी म्हटलं. मात्र तसं काहीच नसल्याचे अंकितांना देखील अनेक मुलाखतीत बोलून दाखवलं. घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला कुठेच काही कमी पडू नये, त्याला सर्व ज्ञात असायला हवे हे त्याला आम्ही शिकवत होतो असं अंकिता म्हणाली. मात्र अनेकांनी याचा चुकीचा अर्थ लावला असं म्हणत अंकिता नेटकऱ्यांना उत्तर दिले. आता अंकिताने सूरजच्या आरामासाठी केलेली कळकळीची कमेंट पाहून साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
सूरजचा स्वागत होतानाचा व्हिडीओ शेअर करत तिने, “आम्ही अशा वातावरणातून आलो आहोत की, मला या शहरी वातावरणाचा त्रास होत आहे. त्याला खरंच सांभाळायची गरज आहे. आम्ही काहीच मदत करु शकत नाही आहोत. पण ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर डील करताना थोड्या आरामाची गरज असते. देवाक काळजी”, असं म्हणत तिने सूरजसाठी कमेंट केली आहे.