Dhananjay Powar Video : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ च्या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची हवा पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वात अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार या रील स्टारने धुमाकूळ घातला. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवरही सूरज चव्हाणने नाव कोरलं. सर्वत्र या स्पर्धकांचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूरचा लोकप्रिय रीलस्टार धनंजय पोवारने ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घातला. थट्टा-मस्करी करुन संपूर्ण घराला हसत खेळत ठेवत धनंजयने साऱ्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली. प्रेक्षकांना सुद्धा धनंजयचं प्रत्येक सदस्याशी असलेलं बॉण्डिंग प्रचंड आवडलं. यामुळेच धनंजयला टॉप-४ च्या शर्यतीपर्यंत मजल मारता आली.
आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडल्यावर डीपीचं भरभरुन कौतुक होताना पाहायला मिळत आहे. डीपीच्या गावीही त्याच्या गावच्या मंडळींकडून त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली गेली. डीपीच्या गावी डीजे लावून त्याची मिरणवुक काढली जाणार होती आणि याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. मुलगा घरी येणार म्हणून धनंजयच्या वडिलांनी सकाळपासून सर्व तयारी केली होती. आधी लेकावर विश्वास न ठेवणारे बाबा आज घरी परतणाऱ्या मुलाची आतुरतेने वाट पाहत होते.
कोल्हापुरला पोहोचल्यावर सर्वप्रथम डीपीने जोतिबाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर इचलकरंजीला त्याचं आगमन झाल्यावर त्याच्या चाहत्यांनी भव्य रॅली काढली. यावेळी डीपीने सर्वांना हात जोडून अभिवादन केले. डीपीसाठी त्याच्या वडिलांची ही खास भेट कायम त्याच्या लक्षात राहण्यासारखी आहे. त्याच्या वडिलांचे एक आगळे वेगळे नाते आहे. बराच काळ त्याने त्याच्या वडिलांशी संवाद साधला नव्हता. मात्र ‘बिग बॉस’मुळे हे वडील-मुलांचं नातं एकत्र आलेलं पाहायला मिळालं.
‘बिग बॉस’च्या घरात असताना फॅमिली वीकमध्येही डीपीला भेटायला त्याचे बाबा कोल्हापूरहुन आले होते. यावेळी वडिलांना पाहून डीपी ढसाढसा रडला. वडिलांच्या तोंडून झालेलं कौतुक पाहून त्याला अश्रू अनावर झाले, तर लेकाबरोबर बोलताच त्याच्या वडिलांनाही रडू आवरेना झालं. आता दोघांमधील या खास नात्याची झलक पाहायला मिळत आहे.