‘बिग बॉस १७’ सुरु झाल्या पासून स्पर्धकांमधील वादामुळे चर्चेत आलं आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनची विशेष चर्चा रंगली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता व विकीमध्ये होणारे वाद तसेच त्यांचं प्रेम पाहून प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. अंकिता लोखंडेने काही दिवसांपूर्वी तिचा एक्स बॉयफ्रेंड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना दिसली.यावेळी बोलताना अंकिताने सुशांतबरोबरच्या ब्रेकअप होण्याचं कारण सांगितलं होतं. यानंतर पुन्हा एकदा अंकिता सुशांतची आठवण काढत रडताना दिसली. (Ankita Lokhande On Sushant Singh Rajput)
एक काळ असा होता जेव्हा अंकिता व सुशांत सिंग राजपूत एकमेकांना डेट करत होते आणि लवकरच ते लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र याआधीच त्यांच्यातील नातं तुटलं. काही वर्षांनंतर २०२२ मध्ये सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला. अंकिता लोखंडे सुशांतची आठवण काढून रडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की, अंकिता अभिषेक कुमारशी सुशांतबद्दल बोलताना दिसतेय. अंकिता सुशांत सिंग राजपूतचे कौतुक करत तो कसा आहे याबद्दल सांगताना दिसतेय. यावेळी ती अभिषेकला सांगतेय की, “जेव्हा तू शर्टशिवाय फिरतोस तेव्हा मला सुशांतची आठवण येते. तू त्याच्यासारखा दिसतोस. त्यांची शरीरयष्टी तुझ्यासारखीच होती.”
तेव्हा अभिषेकने म्हणतो, “त्याचा प्रवास, पार्श्वभूमी ही सुशांतसारखीच आहे.” यावर अंकिता म्हणते की, “पण तो इतका रागिष्ट नव्हता. सुशांत खूप शांत होता. त्याचा प्रवास कसा चांगला होईल याकडे तो अधिकाधिक लक्ष देई. तो खूप मेहनती होता. ती व्यक्तीच वेगळी होती. तो मेहनतीच्या बाबतीत अव्वल होता. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर अधिक मेहनत घेता, त्या गोष्टीच्या खोलात शिरता आणि तेव्हा जर का काही कमी जास्त जाणवलं तर त्याच्या परिणामही तुमच्यावर होतो. मी खूप सहज व सोप्पी आहे. पण सुशांत प्रत्येक गोष्टीत गुंतून जायचा.”
अंकिता पुढे म्हणाली, “त्याला हवं ते मिळवण्यासाठी तो काहीही करायचा. आणि त्यात थोडंसं वर-खाली झालं तर त्याला काळजी वाटायची. ट्विटरवर लोक त्याच्याबद्दल काय बोलत आहेत याचाही तो विचार करत बसायचा. तो एकदम लहान गावातून आलेला मुलगा होता. त्यामुळे भावनिक दृष्ट्या असा विचार करणं त्याच्यासाठी साहजिक होतं. एवढ्या मोठ्या क्षेत्रात नाव कमावणे सोपे नाही.” असं म्हणत अंकिता रडायला लागली. त्यानंतर अभिषेक अंकिताला म्हणाला की, “मी आता सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलणार नाही.” तेव्हा अंकिता म्हणाली, “नाही, ठीक आहे. त्याच्याबद्दल बोलायला बरं वाटतं. मला त्याचा खूप अभिमान वाटतो. तो माझं कुटुंब आहे.”
त्यानंतर अंकिताने सुशांत सिंग राजपूतबरोबरच्या ब्रेकअप आणि त्याच्या मृत्यूनंतर विकी जैनने तिला कसा पाठिंबा दिला याबद्दल सांगितलं. अंकिताने सांगितले की, “सुशांतही विकीचा मित्र होता. आणि अशा बाबतीत विकी त्याला नेहमीच साथ देत असे. काहीच नसताना आता काय करणार? जर कोणी जग सोडून गेले तर तुम्ही काय कराल? तुमचा आधार तुमच्याजवळ असायला हवा. मला साथ देणारे कोणी नव्हतं. पण विकीने सगळं व्यवस्थित हाताळलं. त्याची साथ नसती तर मी काही करू शकले नसते.”