सध्या सिनेतारकांच्या दिवाळी पार्टीची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळतेय. पूर्वदिवाळी पार्टीचं आयोजन कलाकार मंडळी करत असून या पार्टीमध्ये कलाकार मंडळी पारंपरिक लूकमध्ये हजेरी लावताना दिसत आहेत. अशातच मनीष मल्होत्रा यानेदेखील एका शानदार अशा दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये कलाकार मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. मनीषने आयोजित केलेल्या पार्टीला सलमान खान, ऐश्वर्या राय, रेखा, गौरी खान, सुहाना खान, खुशी कपूर, अनन्या पांडे, वरुण धवन असे अनेक नामांकित चेहरे दिसले. मात्र, आता सोशल मीडियावर सलमान व ऐश्वर्या यांच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सलमान-ऐश्वर्याने पार्टीत एकमेकांना मिठी मारल्याचे बोललं जात आहे. (Aishwarya Rai And Salman Khan Photo Viral)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये एक मुलगी गुलाबी रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसत असून तिचा चेहरा केसांनी झाकलेला आहे. दोघेही मनीषच्या घराच्या गेटवर उभे असलेले पाहायला मिळत आहेत. मात्र, या फोटोंमधून सलमानचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. त्या मुलीचा चेहरा केसांनी झाकला असल्यामुळे आणि ऐश्वर्या व त्या मुलीच्या कपड्यांमध्ये देखील बरेचसे साम्य दिसत असल्यामुळे सलमान-ऐश्वर्या यांच्या फोटोवरून सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत.
मात्र हे फोटोस समोर येताच काही चाहत्यांनी या फोटोचे खरे सत्य समोर आणले आहे. या फोटोमध्ये सलमानबरोबर दिसणारी मुलगी ऐश्वर्या नसून ती त्या दिवशी पार्टीत उपस्थित असलेली सूरज पांचोलीची बहीण सना पांचोली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सलमान-ऐश्वर्या यांच्या फोटोवरून सोशल मीडियावर रंगलेल्या अनेक चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, या दिवाळीत सलमानचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘टायगर ३’ येणार असून या चित्रपटात त्याच्याबरोबर कतरिना कैफदेखील दिसणार आहे. तसेच इमरान हाश्मी ‘टायगर ३’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.