भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी त्याची बालमैत्रीण राधिका मर्चंटसह १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. त्याआधी गुजरातमधील जामनगर येथे दोघांच्याही लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू आहे. १ मार्च ते ३ मार्च दरम्याने लग्नाआधीचे कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमांचे स्वरूप अतिशय भव्यदिव्य असणार असून बॉलिवूड, हॉलीवूड तसेच इतर क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर गुजरातमध्ये दाखल झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पाहायला मिळाले आहेत. (Ambani family build temple)
जुलैमध्ये पार पडणाऱ्या विवाहाचे लग्नाआधीचे सर्व कार्यक्रम जामनगर येथील ‘रिलायन्स ग्रीन’मध्ये आयोजित केले गेले आहेत. तीन दिवसांचा हा सोहळा असून सध्या अंबानी कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशातच अंबानी कुटुंबाने गुजरात येथील जामनगरमधील मोतीखावडीमध्ये १४ नवीन मंदिरे बांधण्यात आली आहेत. ही मंदिरे अत्यंत खास असून याची पहिली झलक रिलायन्स फाऊंडेशनच्या सांस्कृतिक केंद्राच्या पेजवरुन शेअर करण्यात आली आहे. शेअर केलेल्या पोस्टच्या एका व्हिडीओमध्ये नीता अंबानी संपूर्ण परिसरात फिरताना दिसत आहेत. तसेच तेथील कारागिरांशी व स्थानिकांशी त्या बोलताना दिसत आहेत. या मंदिरातून भारतातील संस्कृती, वारसा आणि पुराणातील कथा दिसून येत आहेत.
“देशाचा प्राचीन इतिहास व परंपरा एकत्र आणण्याचा तसेच ते जतन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोस्टमध्ये लिहण्यात आले आहे”. अंबानी कुटुंबाद्वारे बांधण्यात आलेल्या या मंदिरांचे बांधकाम हे अतिशय सुंदर आहे. यामधून वास्तुशिल्पाच्या विविध छटा दिसून येत आहेत. नक्षीदार खांब, देवी-देवतांच्या मूर्त्या व फ्रेस्को शैलीतील चित्राकृती आहेत.
दरम्यान, अनंत व राधिका हे बालपणीचे मित्र आहेत. २०२२ मध्ये दोघांचाही साखरपुडा पार पडला होता. १२ जुलै रोजी दोघेही लग्नबंधनात अडकणार असून हे लग्न देशातील महागडे लग्न ठरू शकते. या विवाहसोहळ्याला देश-विदेशातील मोठ्या व्यक्तींची उपस्थिती असणार आहे. अंबानी कुटुंबियांच्या घरातील हा मोठा विवाह सोहळा असल्याने संपूर्ण देशाच्या नजरा याकडे लागून राहिल्या आहेत.