Nandita Patkar opinion : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्याभोवती असलेली चर्चा सुरुच आहे. अभिनेता शशांक केतकर याने सोशल मीडियावर मंदार देवस्थळीवर आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर आरोप करत पाच लाख रुपये थकवल्याचा दावा केला. यासोबतच त्याने दोघांमधील चॅट्स आणि फोनवर झालेल्या सवांदाची ऑडिओ क्लिपही शेअर केली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण मराठी इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून अनेक कलाकारांनी शशांक केतकरला पाठिंबा दर्शवला होता.
आता ‘एलिझाबेथ एकादशी’ फेम अभिनेत्री नंदिता पाटकर हिने मंदार देवस्थळी सोबत काम करतानाचा तिचा अनुभव मोकळेपणाने मांडला आहे. नुकतीच तिने ‘इट्स मज्जा’ या युट्युब वहिनीला ला दिलेल्या मुलाखतीत या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं. नंदिता पाटकर हिने ‘माझे पती सौभाग्यवती’ या मराठी मालिकेत अभिनेता वैभव मांगलेसोबत प्रमुख भूमिका साकारली होती. ही मालिका तिच्या करिअरमधील पहिलीच मालिका होती आणि या मालिकेचं दिग्दर्शन मंदार देवस्थळी यांनी केलं होतं. मुलाखतीदरम्यान नंदिताने स्पष्ट केलं की, तिच्या बाबतीत कधीही पैसे बुडाल्याचा अनुभव आलेला नाही. (Nandita Patkar opinion)
ती म्हणाली की, “कधीकधी मानधन उशिरा मिळालं, पण कधीच मिळालं नाही असं झालं नाही. कलाकार खूप मेहनत करतो आणि त्याला वेळेवर पैसे मिळणं गरजेचं आहे. शेवटी ती आपली रोजीरोटी आहे. आधीच मालिकांमध्ये कलाकारांना अनेकदा तीन-तीन महिने उशिरा पैसे मिळतात.” मंदार देवस्थळींसोबत काम करतानाचा अनुभव सांगताना नंदिताने त्याचं कौतुकही केलं. तिच्या मते, मंदार एक अत्यंत क्रिएटिव्ह दिग्दर्शक असून तो नाटकाच्या धाटणीने सीनची तालीम घ्यायचा. छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष देत अभिनय अधिक प्रभावी कसा होईल यासाठी तो कलाकारांना मार्गदर्शन करायचा, असं तिने सांगितलं. “माझ्यासाठी तो मालिकेतला पहिला दिग्दर्शक होता. मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळालं,” असंही ती म्हणाली. या सगळ्या वादावर भाष्य करताना नंदिता पाटकरने असंही नमूद केलं की, कलाकारांच्या हातात फारसं काही नसतं. पैसे थकवले गेले तर कलाकार जास्तीत जास्त आवाज उठवू शकतात, कायदेशीर मार्ग अवलंबू शकतात किंवा सोशल मीडियावर बोलू शकतात, जेणेकरून इतर लोक सावध होतील”. (Nandita Patkar opinion)
आणखी वाचा – मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, पारंपरिक लग्नविधींना सुरुवात, फोटो समोर




