Amruta Khanvilkar New Home : सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार मंडळींचही स्वतःचं हक्काचे घर असावं हे स्वप्न असतं. अनेक कलाकार मंडळी या स्वप्नाच्या मागे लागून अहोरात्र काम करताना दिसतात. हे स्वप्न पूर्ण करणं हे प्रत्येकासाठी एक जबाबदारीच असते. अनेक कलाकार मंडळींनी त्यांचं स्वतःचं हक्काचं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केलेली पाहायला मिळालीय. या पाठोपाठ आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आणखी एका अभिनेत्रीनं तिचं नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. लक्ष्मीपूजनादिवशी अभिनेत्रीने नवं घर घेतलं असल्याची गुडन्यूज साऱ्यांना दिली आहे.
‘अनेक वर्षांपासूनचं स्वप्न सत्यात उतरलं’, असं म्हणत अमृता खानविलकरने मुंबईत आलिशान असं घर खरेदी केलं आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या घराची पहिली झलक अभिनेत्रीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केलेली पाहायला मिळाली. मराठीसह बॉलीवूड सिनेसृष्टीत अनेक चित्रपटांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारत
अमृताने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अमृताचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावरुन ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. बरेचदा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव ती चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते.
अशातच अमृतानं तिचं गृह स्वप्न पूर्ण झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केलेली आहे. घराचा व्हिडीओ शेअर करत तिच्या घराचं इंटेरियरचे काम सुरु असल्याचे तिने यावेळी सांगितले. यावेळी सुंदर असं कॅप्शन देत पोस्ट शेअर करत नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी अभिनेत्रीने दिली. अमृताने व्हिडीओसहा कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “चला भेट झालीच आपली. कधी काळी दूर कुठेतरी तुझं स्वप्न पाहिलं होतं आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न रोज सुरु होता. तर ही आपली पहिली दिवाळी. तुला खूप गोष्टी सांगायच्या आहेत. मला काय आवडतं, काय नाही, मनातलं गुपित, शांततेतलं सारं काही, हळूहळू तुला कळेलच”.
पुढे तिने असेही लिहिलं आहे की, “तुलाही मला खूप काही सांगायचं असेल. माझी पूर्ण तयारी आहे. तू अजून हळूहळू आकार घेतोयस, तुझ्या कानाकोपऱ्यात मी माझं सगळं जग बसवायचा प्रयत्न करतेय. तू ही अगदी माझ्या हो ला हो म्हणतोयस. आवडतंय मला. लवकरच भेटू, नव्या कोऱ्या भिंतींसह, नव्या आठवणी बनवण्यासाठी आणि नवं आयुष्य उलगडण्यासाठी”. अमृताच्या या पोस्टवर कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.