‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. रहस्यमय कथानकामुळे आणि मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत केदार या पात्राची एन्ट्री झाली. मालिकेत केदार या पात्राची एन्ट्री झाल्यापासून मालिकेला एक नवीन वळण आले आहे. केदार या पात्रामुळे कथानक वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत केदारची भूमिका अभिनेता अभिजीत केळकरने साकारली आहे. त्याची ही भूमिका सर्वांची लक्षवेधी आहे. (Satvya Mulichi Satavi Mulgi Serial Updates)
मालिकेत नेत्रा केदारच्या विरोधात उभी न राहता शेखरला पाठिंबा देते. केदार केतकीला मनवून कुटुंबात फूट पाडण्याचा आणि वारंवार मैथिलीला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण नेत्रा आणि ईशा त्याचे हे प्रयत्न हाणून पाडतात. केदार अद्वैत आणि शेखरमध्येसुद्धा भांडण लावण्याचा प्रयत्न करतो. इकडे पण नेत्रा त्याचे डाव उधळून लावते. केदार ईशाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करतो, पण चुकून रीमाला यात गोवतो. अशातच गेल्या भागात केदारने नेत्राच्या मुलींमध्येही भांडण लावण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले.
केदार ईशासाठी एक ड्रेस घेऊन येतो. मात्र रीमासाठी तो काहीही आणत नाही आणि नेत्राने ईशा यातही ड्रेस आणायला सांगितल्याचे रीमाला सांगतो. यामुळे तिच्या मनात संशय निर्माण होतो. त्यानंतर केदार रीमा यांना घेऊन बाहेर जातो आणि रीमाला ती अद्वैत-नेत्राची मुलगी नसल्याचे सांगतो आणि रीमाही त्यावर विश्वास ठेवते. त्यानंतर ही गोष्ट रीमाने कुणाला सांगू नये असंही तिला म्हणतो. अशातच आता आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यातून केदारचा खोटेपणा समोर येणार आहे. केदार पायाला लागल्याचे नाटक करत सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याची हीच गोष्ट नेत्रा व ईशा ओळखतात.
यावेळी ईशा केदारच्या अंगावर खोटा साप टाकते. यामुळे केदार घाबरतो आणि डायनिंग टेबलवर चढतो. त्याचा हा खोटेपणा सर्वांसमोर उघड होतो. यावेळी त्याला असं हे बघून केतकीचाही त्याच्यावरचा विश्वास उडतो. यानंतर तेजस त्याला विचारतो की, “तू हे सगळं सहानुभूतीसाठी करत होतास का?”. यानंतर नेत्रा असं म्हणते की, “मी सांगते केदारने हे असं नाटक का केलं?” दरम्यान, यापुढे प्रोमो कट होतो. त्यामुळे आता नेत्रा केदारच्या या नाटक करण्यामागचे नेमके कारण काय सांगणार? केदार त्याची ही फसवणूक कशी सिद्ध करणार? हे मालिकेच्या आगामी भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.